माहीजळगावमध्ये एका शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

निलेशे दिवटे
शुक्रवार, 10 जुलै 2020

तालुक्यातील माहीजळगाव येथील भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) या शेतकऱ्याने नगर- सोलापुर हायवे नजीक असलेल्या स्वतः च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील माहीजळगाव येथील भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) या शेतकऱ्याने नगर- सोलापुर हायवे नजीक असलेल्या स्वतः च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत समजलेली माहिती अशी की भाऊसाहेब हे सकाळी शेतातील विहिरीतून पाणी आणतो असे सांगून घरातून सायकलवर निघाले. मात्र ते परत आले नाहीत. बराच वेळ झाला ते कसे काय आले नाहीत म्हणून घरात चलबिचल सुरू असताना एकाने ही दुर्घटना घरी सांगितली. या घटनेची माहिती समजताच पोलिस पाटील हनुमंत शिंदे यांनी पोलिसांना खबर केली. घटनास्थळी मिरजगाव दूरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी ज्ञानदेव गर्जे आणि रवींद्र वाघ यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ सायकल उभा आणि त्यांनी शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दृश्य दिसले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र सतत नापिकी आणि कर्जामुळेच आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. ते माहिजळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख यांचे चुलत बंधू होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by strangulation of a farmer in Mahijalgaon