विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल होताच सुजित झावरे पोलिसांत हजर

मार्तंड बुचुडे
Friday, 18 September 2020

आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यास तहसीलदार कार्यालयात  शेतकऱ्यांसह गेलो होतो. परंतु तहसीलदार लवकर बाहेर न आल्याने आम्ही  कार्यालयात गेलो. परंतु तहसीलदार यांनी म्हणणे ऐकून न घेता कायद्याचा बडगाच उगारला. तसेच वाद घातला. 

पारनेर  ः केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा घेतलेला निर्णय शेतकरी विरोधात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन काल (ता. 17 ) तहसीलदारांना शेतक-यांसह देण्यासाठी गेलेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यात बाचाबाची झाली.

याच कारणातून झावरे यांच्या विरोधात देवरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार झावरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले होते. हे समजताच झावरे स्वतःहून रात्री 12 वाजणेच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर झाले. 

या बाबत माहिती अशी की, झावरे काल दुपारी 12 वाजणेच्या सुमारास तहसील कार्यालयात कांदानिर्यात बंदीचा  केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठीचे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्या वेळी निवेदन देण्यासाठी फक्त पाच लोकांनीच आत यावे, असे तहसीलदार देवरे यांनी सांगीतले. मात्र, या वेळी त्यापेक्षा अधिक कार्यकर्ते आत गेल्याने झावरे व देवरे यांच्यात वाद झाला.

या वादातून झावरे व देवरे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. त्यातून त्याच्यांत बाचाबाची झाली. देवरे यांनी काल दुपारनंतर झावरे यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार झावरे यांच्यावर विनयभंग, शासकीय कामात अडथळा व खंडणी अशा गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल झाले होते.

झावरे  यांना आपल्यावर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे समजताच ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांची  वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना नगर येथील सरकारी दवाखान्यात  उपचारासाठी दाखल केले.

आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यास तहसीलदार कार्यालयात  शेतकऱ्यांसह गेलो होतो. परंतु तहसीलदार लवकर बाहेर न आल्याने आम्ही  कार्यालयात गेलो. परंतु तहसीलदार यांनी म्हणणे ऐकून न घेता कायद्याचा बडगाच उगारला. तसेच वाद घातला. 

 

हा गुन्हाच खोटा

शेतकऱ्यांसाठी निवेदन देणाऱ्या माझ्यावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. मला गुन्हे दाखल झाल्याचे समजताच मी स्वतःहून पोलिसांत हजर झालो आहे,

- सुजित झावरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद नगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujit Jhaware appeared before the police as soon as the case of molestation and ransom was registered