लंकेंनी शायनिंग करण्यापेक्षा जनतेची कामं कारवित, झावरेंचा खोचक सल्ला

अनिल चौधरी
Thursday, 5 November 2020

तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई व पीक विमा मिळणे गरजेचे आहे.

निघोज : अतिवृष्टी झालेल्या नगर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झाले. मात्र,पारनेर तालुक्यात अद्याप छदामही मिळाला नाही. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असते, असे सांगत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शायनिंग (चमकोगिरी) करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी.

तुम्ही कोणाच्या विमानात बसता यापेक्षा जनतेला तुम्ही किती मदत करता हे महत्त्वाचे असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता केली.

तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सुमारे एक कोटी रुपयांच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन आज झावरे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे होते.

या वेळी बोलताना सुजित पाटील झावरे म्हणाले की, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यात मोठे नुकसान झाले. ऊस, कांदा, डाळिंब, सीताफळ ही पिकेदेखील वाया गेली आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे धोरण घेतले आहे. मात्र, तालुक्यातील पळशी मंडल वगळता इतर ठिकाणीच्या कोणत्याही मंडलामध्ये पंचनामेच झाले नाहीत. तर मदत काय मिळणार?असा सवालही सुजित झावरे यांनी केला.

लोकप्रतिनिधी हे लोकांसाठी असतात. पक्षासाठी नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात जनतेला मदत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुम्ही कोणाच्या विमानात बसता याचे जनतेला काही देणेघेणे नाही.

तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई व पीक विमा मिळणे गरजेचे आहे. परंतु ही गोष्ट होत नसल्याचे खंत व्यक्त करीत हे तालुक्याचे दुर्दैवच असल्याचेही झावरे पाटील यांनी सांगितले. 

रांजणगाव गणपती येथील एमआयडीसीमधील विषारी रसायन पारनेर तालुक्यातील देवीभोयरे व जवळा या परिसरातील कॅनॉलच्या ओढयाखाली मध्यरात्री टॅंकरमधून ओतून देत असल्याने त्याचा पिकांवर घातक परिणाम होत आहे.

यामधेही मोठ्या लोकांचे हितसंबंध असल्याचा आरोप करीत या संदर्भातही लवकरच जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी सांगितले.

या वेळी सरपंच पंकज कारखिले, किरण कारखिले, सतीश गाडीलकर, जयसिंग बेंडाले, अंकुशराव कारखिले, दामोदर टकले, मंगेश कार्ले, ज्ञानदेव कारखिले, शशिभाऊ कारखिले, रवी कारखिले, संतोष डोमे, बलभिम कारखिले, मदन डोमे, भरत शेठ शितोळे, अतुल मोरे, निलेश शितोळे, राजेंद्र शितोळे, शिवाजीराव गाडीलकर, लक्ष्मण कारखिले, सोन्याबापू डोमे, पिंटू सरोदे, हनुमंत कारखिले, नरेश सोनवणे, पप्पू कार्ले, प्रसाद शितोळे, परसराम कारखिले, तुळशीराम गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sujit Zhaware's criticism of Lanka