अण्णा हजारे यांना पोलिस अधिक्षक पाटील म्हणाले ‘मी पुन्हा येईन’

एकनाथ भालेकर 
Wednesday, 28 October 2020

राज्याचे माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील आबा यांच्या निवडणूक प्रचाराला गेलो होतो. विजयानंतर आबांनी आभारही मानले.

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : राज्याचे माजी गृहमंत्री (कै.) आर. आर. पाटील आबा यांच्या निवडणूक प्रचाराला गेलो होतो. विजयानंतर आबांनी आभारही मानले. त्यांच्याकडे शुद्ध विचार, आचार, त्याग, निष्कलंक जीवन व चारित्र्य, असे गुण होते, अशी आठवण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढली. 

नूतन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी हजारे यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगले काम करा. नगर जिल्ह्यात आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश, विश्वास नांगरे यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. ती परंपरा आपण पुढे न्यावी, असे आवाहन हजारे यांनी पाटील यांना केले. 

पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यात हजर झाल्यानंतर हजारे यांची भेट घेण्याची इच्छा होती; परंतु कोरोनाची बाधा झाल्याने भेटीला उशीर झाला.

महाविद्यालयात असताना, एकदा राळेगणसिद्धीला येण्याचा योग आला होता. त्यावेळी हजारे यांचे राळेगणसिद्धीतील काम पाहून, त्यांची भाषणे ऐकून प्रभावित झालो होतो. हजारे यांच्याबद्दल खूप ऐकले, वाचले आहे. यूपीएससीच्या अभ्यासाच्या वेळीही राळेगणसिद्धी व हजारे यांचा मी खूप अभ्यास केला होता. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत सुरक्षाप्रमुख म्हणूनही येथे आलो होतो. त्यानंतर आता हजारे यांच्या जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याचा आनंद आहे. हजारे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घ्यायला आवडेल.'' 

पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी, राजेंद्र भोसले, संजय पठाडे, श्‍याम पठाडे, भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते. 

मी पुन्हा येईन 
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, राळेगणसिद्धीत येताना ओढे, नाले वाहताना, तसेच बंधारे, पाझरतलाव भरलेले पाहिले. अण्णा हजारे यांच्या पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमाचे हे फलित आहे. आज मुलासोबत आलोय. काही दिवसांतच कुटुंबासह पुन्हा एकदा राळेगणसिद्धी पाहण्यासाठी येणार आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superintendent of Police Manoj Patil meet on Anna Hazare