ऑनलाइन सभेत गोंधळ! कल्याण रस्ता परिसराचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर; सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा 

आमित आवरी
Wednesday, 9 December 2020

केंद्र सरकारच्या अमृत मिशन कार्यक्रमांतर्गत सुधारित विकास आराखडा तयार करण्याबाबत आज महापालिकेत ऑनलाइन सर्वसाधारण सभा झाली

अहमदनगर : केंद्र सरकारच्या अमृत मिशन कार्यक्रमांतर्गत सुधारित विकास आराखडा तयार करण्याबाबत आज महापालिकेत ऑनलाइन सर्वसाधारण सभा झाली. मात्र, सभा सुरू असतानाच, नगर-कल्याण रस्ता परिसर व आगरकर मळा येथील स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी पाणीप्रश्‍नावर तेथे येऊन गोंधळ घातला. त्यामुळे सभेतील विषय उरकून पाणीप्रश्‍नावरच सभा गाजली. 

महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, गणेश भोसले, अविनाश घुले, आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, नगररचनाकार राम चारठाणकर आदी उपस्थित होते. ऑनलाइन सभा सुरू होण्यापूर्वीच कल्याण रस्ता परिसर व आगरकर मळा येथील नागरिकांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. सभा सुरू असल्याने निवेदन घेण्यासाठी अधिकारी आले नाहीत. आयुक्‍तांनीही सभेनंतरच चर्चेचे आश्‍वासन दिले.

त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक अनिल शिंदे, सचिन शिंदे, श्‍याम नळकांडे, अनिल बोरुडे व नागरिकांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. नगरसेवकांसह काही जण हातात फलक घेऊन थेट सभेच्या ठिकाणी घुसले. 
महापालिका आयुक्‍त, अथवा पाणीपुरवठा विभागप्रमुखांनी निवेदन घेऊन प्रश्‍न सोडविण्याची मागणी आंदोलकांनी केली. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्व शहरातील पाणीप्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. 

महापौर वाकळे म्हणाले, की नगर-कल्याण रस्ता परिसरातील पाणीप्रश्‍न गंभीर आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन करा. नागरिकांना बरोबर घ्या. अमृत, फेज योजनांचा विचार करीत बसू नका, तत्काळ पाणी द्या. 

..तर कंत्राटी कर्मचारी नेमणार 
महापालिका कर्मचाऱ्यांची बदली केल्यास, ते कामावर हजर होत नाहीत. बदली नको, अशीच कर्मचाऱ्यांची संस्कृती झाली आहे. हे पाहता, मला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. बदलीच्या ठिकाणी हजर होत नसलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या पगाराच्या रकमेतून कंत्राटी कर्मचारी नेमावे लागतील, असा इशारा महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी दिला. 

शेतकरी आंदोलनास पाठिंबा 
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सभेच्या सुरवातीलाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही शेतकरी आंदोलनास पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. 

कोतकरांना केडगावची चिंता 
नगर-कल्याण रस्ता परिसराला बाह्यवळण रस्त्याने जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी देण्याची मागणी सभेत नगरसेवक अनिल शिंदे यांनी केली. त्यामुळे चिडलेल्या मनोज कोतकर यांनी नगर-कल्याण रस्ता परिसराचा पाणीप्रश्‍न सुटणे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी केडगावचा पाणीप्रश्‍न निर्माण करू नका, असे सांगितले. 

संपादन : अशोक मुरुममकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support of all corporators on water issue in Municipal Corporation meeting