
शिर्डी : घटकाभराच्या आधाराने सावरला संसार
शिर्डी : बंगळुरूमध्ये दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी होती. राजा-राणीचा संसार सुखाने चालला होता. मात्र, पतीच्या जिवाला पाठीच्या दुखण्याने घोर लावला. उपचारासाठी दोघांनाही सोलापूरच्या घरी यावे लागले. मग घरात सासू आणि नणंदेसोबत खटके उडू लागले. त्यातून आपल्या तीन वर्षे वयाच्या चिमुरडीला मागे सोडून तिने रागाच्या भरात घर सोडले. सुदैवाने शिर्डीत बाबांच्या नगरीत तिला ‘आश्रया’ परिवारात रात्रीचा आसरा मिळाला. रागाचा भर ओसरताच पश्चात्ताप झाला. नाट्यमय घडामोडींनंतर पती व चिमुरडीसोबत तिने पुन्हा घरची वाट धरली.
साई आश्रया अनाथाश्रम परिवाराचे गणेश दळवी व साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून, मोडणारा एक संसार आणि रागाने घर सोडलेल्या त्या महिलेची बिकट होऊ शकणारी वाट सुकर झाली. याबाबत माहिती देताना दळवी म्हणाले, की घरात खटके उडू लागल्याने रागाच्या भरात आत्महत्येचे विचार डोक्यात ठेवून ही महिला घराबाहेर पडली. ती शिर्डीत आली. साईमंदिर परिसरात ती रडत असल्याचे लक्षात आल्याने, सुरक्षारक्षकाने तिला साईसंस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात नेले. तेथील सतीश कोते यांनी साईसंस्थानचे माजी विश्वस्त तांबे यांना फोन करून त्याबाबतची माहिती दिली. तांबे यांनी मला याबाबत कळविले. आम्ही तिला आश्रमात घेऊन आलो, मात्र राग कायम असल्याने ती पतीचा मोबाईल क्रमांक देत नव्हती.
सकाळी डोके शांत झाल्यावर तिला आपल्या पतीची आणि मुलीची आठवण येऊ लागली. मग तिने दळवी यांच्याकडे पतीचा मोबाईल क्रमांक दिला. व्हिडिओ कॉलद्वारे दोघांशी संपर्क होताच ती पुन्हा रडू लागली. तिने घर सोडल्यापासून काळजीत असलेल्या पतीचा जीव भांड्यात पडला. काल तो व तिचे काका येथे तातडीने दाखल झाले. पुन्हा भांडण करायचे नाही, असे कधी घराबाहेर पडायचे नाही, असा निश्चय व्यक्त करीत तिने पुन्हा सोलापूरची वाट धरली.
निघाली मुंबईला, पोचली शिर्डीला
घरात वाद झाल्यानंतर ही महिला रागाने सोलापूर बसस्थानकावर आली. तिला मुंबईला जायचे होते. मात्र, त्यासाठी तिकिटाचे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे ती शिर्डीकडे निघालेल्या बसमध्ये बसली.
Web Title: Support From Sai Ashraya Women Who Committed Suicide Family Problem Shirdi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..