esakal | Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"

Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सुरत- चेन्नई हा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्ग नगर जिल्ह्यातून जाणार असून, जिल्ह्यात त्याची लांबी 180 किलोमीटर असणार आहे. सुरत- नाशिक- अहमदनगर- सोलापूर- चेन्नई असा हा मार्ग असेल. यामुळे दिल्ली ते चेन्नईचे अंतर 330 किलोमीटरने कमी होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

नगर जिल्ह्यातील चार हजार 74 कोटी रुपयांच्या महामार्गांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज (शनिवारी) गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘सुरत- चेन्नई या नवीन ग्रीन फिल्ड रस्त्यादरम्यान नगर जिल्हा येत आहे. त्यामुळे विकास झपाट्याने होईल. या रस्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागा हस्तांतरासाठी मदत करावी. एकूण 50 हजार कोटी रुपयांच्या या रस्त्यापैकी आठ हजार कोटी रुपये नगर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च होणार आहेत. महाराष्ट्रात या रस्त्याची लांबी 450 किलोमीटर असून, नगर जिल्ह्यात 180 किलोमीटर असेल. त्यामुळे नगरच्या विकासाला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दीड पट जास्त दर दिला जात आहे.’’ महाराष्ट्राच्या महसूल विभागाने खूप जास्त दर सुचविला आहे. असे झाले तर रस्त्याला निधी कसा मिळणार, असा टोला त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना लगावला.

शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले, की या रस्त्यामुळे दिल्ली ते चेन्नईदरम्यानचे अंतर 330 किलोमीटरने कमी होणार आहे. जिल्ह्यातून रस्ता जातो म्हटल्यावर आराखड्याप्रमाणे पुढाऱ्यांनी जागा घेऊन ठेवू नयेत, तर सरकारने या जागा घेऊन हस्तांतर करावे, असा टोला त्यांनी जिल्ह्यातील पुढाऱ्यांना लगावला. या रस्त्याबरोबरच तळेगाव- जामखेड, कोपरगाव- सावळीविहीर आदी रस्त्यांचीही त्यांनी घोषणा केली. औरंगाबाद ते वाळूजदरम्यान लवकरच उड्डाणपूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचे गडकरींकडून कौतुक

शिर्डी विमानतळाजवळ नवीन शहर उभारण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले. शिर्डीचा विकास झाला. आता परिसराचाही होणार आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. नवीन शहर निर्मिती ही संकल्पना चांगली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पुणे प्रवास सुखकर होणार

नगर- पुणे रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. वाघोली ते शिरूरदरम्यान ओव्हरब्रीज, स्कायबस यांसारख्या पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच नगर ते पुणे वाहतूक सुखकर होईल. नगरच्या उड्डाणपुलासाठी 25 कोटी मिळण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. लवकरच ते मिळतील. दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी या पुलासाठी माझ्याकडे वारंवार चकरा मारल्या होत्या. त्यांची आठवण या निमित्ताने होते, असे गडकरी म्हणाले.

loading image
go to top