कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठानने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर

अशोक निंबाळकर
Thursday, 24 September 2020

कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठानने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठानने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे.

अहमदनगर : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठानने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठानने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे.
 
सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठानच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. हे लक्षात घेऊन स्वयंभू प्रतिष्ठानने रक्तदान करण्याचे ठरविले. स्वयंभू प्रतिष्ठानच्या 100 पेक्षा जास्त युवा शिलेदारांनी रक्तदान केले. 'नातं रक्ताचं' या उपक्रमांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे 24 तास रक्तपुरवठा स्वयंभू प्रतिष्ठान करत आहे. रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून अहमदनगर जिल्ह्यात स्वयंभूने रक्तसाखळी सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये गरजूंना 24 तास रक्त पिशव्या उपलब्ध करून देण्याचे कार्य स्वयंभूने केले आहे. 

आजच्या कार्यक्रमातही युवकांनी हिरीरीने सहभाग दाखवत भव्य रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी बायोमी टेक्नॉलॉजीचे डॉ. प्रफुल गाडगे, माध्यम तज्ञ सचिन चोभे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, एकता सेवा मंचचे सुमित वर्मा, प्रा.संजय साठे, प्रा.साईनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ते अजित कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वयंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरग काळे यांनी सांगितले की, रक्तदानासारखे महत्वपूर्ण काम स्वयंभू प्रतिष्ठान तीन वर्षांपासून करत आहे. स्वयंभूचे युवा शिलेदार ऋषिकेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नातं रक्ताचं  उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजवर स्वयंभूने विविध क्षेत्रात कार्य केले आहे. असे असले तरी अहमदनगर जिल्ह्यात स्वयंभू प्रतिष्ठानला रक्तदान उपक्रमासाठी ओळखले जाते. 

स्वयंभू प्रतिष्ठानचे सचिव संतोष वाघ यांनी म्हटले की, आम्ही स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे शिलेदार एकत्र येतो आणि जमतील तेवढे पैसे गोळा करून कार्यक्रम घेतो. युवकांच्या माध्यमातून एवढे मोठे काम उभा करणाऱ्या स्वयंभू प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराचा आम्हाला अभिमान आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swayambhu Pratishthan in Ahmednagar has launched a blood donation camp campaign