महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत

अशोक मुरूमकर 
Sunday, 27 September 2020

निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एकीकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मात्र, शाळा सुरु झाल्याशिवाय निवडणूका जाहीर करु नयेत, असा सूर शिक्षक संघटनांमध्ये आहे.

अहमदनगर : बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, ग्रामपंचायत आणि पोटनिवडणूकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एकीकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मात्र, शाळा सुरु झाल्याशिवाय निवडणूका जाहीर करु नयेत, असा सूर शिक्षक संघटनांमध्ये आहे.
 
देशात मार्चपासून कोरोना व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली. सध्या त्याने संपूर्ण देश कवेत घेतला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. काही ग्रामपंचायतींवर निवडणूका न झाल्याने प्रशासक नेमण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही निवडणूका होतील अशी चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याकडून प्रचार सुरु आहे.

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदारसंघ व ग्रामपंचायतीसह ज्या ठिकाणी नगरसेकसकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या ठिकाणी पोटनिवडणूका होणार आहेत. कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळामुळे निवकडणूका घेण्यात आल्या नाहीत. अजूनही कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच बिहारच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही आता निवडणूका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूकांमध्ये शिक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी असते. निवडणूका घेताना शिक्षकांना निवडणूक प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष मतदान घेण्यासाठी मतदान केंद्रावर शिक्षकांवर जबाबदारी असते. मात्र, शाळा सुरु झाल्याशिवाय निवडणूका घेऊ नयेत, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशन व शिक्षक संघटना बचाव समिती याबाबत निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवणार आहे. 

याबाबत माहिती देताना बाळासाहेब गोतारणे म्हणाले, बिहारमधील निवडणूका जाहीर झाल्याने महाराष्ट्रातही निवडणूका जाहीर होऊ शकतात. मात्र, तोपर्यंत शाळा सुरु होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूका जाहीर करु नयेत. या मागणीचे आम्ही संबंधित विभागाला पत्र देणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teachers union is saying that elections should not be held in Maharashtra without starting schools