esakal | सह्याद्रीच्या कुशीत भात उत्पादनात वाढ घडवणारी विरांगणा
sakal

बोलून बातमी शोधा

Technically farmed by Shantabai Khandu Dhande of Akole taluka

सह्याद्रीच्या कुशीत डोंगर माथ्यावर वसलेल्या आंबेवंगण या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवले.

सह्याद्रीच्या कुशीत भात उत्पादनात वाढ घडवणारी विरांगणा

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : सह्याद्रीच्या कुशीत डोंगर माथ्यावर वसलेल्या आंबेवंगण या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी महिलेने तंत्रज्ञानाची कास धरत आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवले. भात या पारंपरिक पिकाच्या उत्पादनात दुपटीने वाढ घडवून आणली आहे. यासाठी त्यांनी ‘बायफ’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेबरोबर कार्य सुरू करून त्यांच्या तज्ञांकडून भात लागवडीच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. 

भात लागवडीचे चारसूत्री एसआरआय आणि एसआरटी या तीनही पद्धतींचा अभ्यास करून भात लागवडीस सुरुवात केली. आपले शेत संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविले जावे ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी सर्वप्रथम गांडूळ खत निर्मिती आपल्या घराच्या अंगणात सुरू केली. त्यानंतर सर्वप्रथम चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून भात लागवड सुरुवात केली. यासाठी बायफच्या कृषी तज्ञांनी त्यांना मदत केली. 

चारसूत्री पद्धतीने प्रथम त्यांनी या भागांमध्ये भात लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये त्यांना सुमारे 33 टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या संपूर्ण भात शेतीमध्ये बदल घडवून आणला. चारसूत्री सोबतच जंगलांना लागून आणि पाणी न थांबणारी भात खाचरे आहेत. त्यामध्ये एसआरटी आणि एसआरआय या सुधारित भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांनी केला.

त्यापासूनही त्यांना उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. भात हे मुख्य पीक असल्याने आदिवासी बांधवांचे जीवन चरितार्थाचे मुख्य पीक मानले जाते. त्यामध्ये केलेले अमुलाग्र बदल शांताबाई धांडे यांना फायद्याचे पडले. हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वयंसहायता समूह यांच्या मदतीने भात लागवडीचे हे तंत्रज्ञान गावोगावी नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली, शेतकऱ्यांच्या भेटी, गटचर्चा, महिला मेळावे, शेतकरी मेळावे पीक प्रात्यक्षिके यांच्या माध्यमाने त्यांनी भात लागवडीच्या या तीनही तंत्रज्ञानाचा आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे. त्यांच्या विशेष कार्याने आणि शेती तंत्रज्ञानाच्या प्रसाराने परिसरातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे भात उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत झाली आहे. त्या स्वतः इंद्रायणी, फुले समृद्धी जिरवेल, आंबेमोहर, काळ भात इत्यादी सुवासिक वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. त्यांचे भात लागवडीचे प्रयोग बघण्यासाठी दूरवरून शेतकरी येतात. 

जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू, जुन्नर, आंबेगाव, पेठ, सुरगाणा हरसुल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील अनेकजण त्यांची शेती पाहण्यासाठी येतात. त्यांना कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांचेकडून ही तांत्रिक मार्गदर्शन व मदत मिळाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top