‘पुन्हा ठणकावून सांगते, मी भ्रष्टाचार केला नाही’; तहसीलदार देवरेंची पुन्हा पोस्ट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tehsildar

‘पुन्हा ठणकावून सांगते, मी भ्रष्टाचार केला नाही’ - देवरे

पारनेर (जि.अहमदनगर) : ‘‘मी कोणताही भ्रष्टाचार, गैरव्यवहार अथवा अनियमितता केलेली नाही, हे पुन्हा एकदा ठणकावून सांगते आहे. यापलीकडे मी काहीही स्पष्टीकरण देण्याच्या मन:स्थितीत नाही. कृपया मला जे ओळखतात, त्यांनी तरी मानसिक त्रास देऊ नये,’’ अशी पोस्ट तहसीलदार ज्योती देवरे (tehsildar jyoti deore) यांनी शनिवारी (ता.२१) सोशल मीडियावर व्हायरल केली.

तहसीलदार देवरे म्हणतात....

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात देवरे यांची कथित ऑडिओ क्लिप व नंतर आमदार नीलेश लंके यांची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप, यांमुळे तालुक्यातच नव्हे, तर राज्यात खळबळ उडाली आहे. आज देवरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्या म्हणतात, की पुढील स्पष्टीकरण राज्याच्या महिला आयोग, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जाईल. मी सावरलेली असून, मी निर्भयपणे माझ्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. संबंधित ऑडिओ क्लिप मी व्हायरल केलेली नाही. मी माझे शासकीय कामकाज करीत आहे. प्राप्त परिस्थितीत नाउमेद न होता मी पुन्हा जिद्दीने वाट चालत राहणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी तहसीलदार देवरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

हेही वाचा: ज्योती देवरे Audio clip व्हायरल : आ.लंकेंचे video तून आरोप

देवरेंचे ऑडिओ क्लिपद्वारे आरोप

तहसीलदार देवरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. मात्र, यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नाही. आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून क्लिपमध्ये त्या म्हणतात, की मी लवकरच तुझ्या वाटेने सोबतीला येत आहे. एक महिला अधिकाऱ्याचा प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात, तसेच वरिष्ठसुद्धा त्यांना कसे पाठीशी घालतात, याचाही उल्लेख क्लिपमध्ये केला आहे.

त्या म्हणतात, की पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणावरून लोकप्रतिनिधींनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घ्यायला लावण्यात आले. तसेच, आपल्या विरोधात विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या वाहनचालकाकडून लिहून घेणे, ॲट्रॉसिटीची धमकी देणे, असे अनेक प्रकार माझ्याबाबत घडले आहेत. त्यामुळे आत्महत्येचाच मार्ग दिसत आहे. तत्त्वांना मुरड घालून हुजरेगिरी करत तळवे चाटता येत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही. वरिष्ठांना सांगूनही उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी व आपण एका रथाची दोन चाके आहोत, मात्र आपल्या चाकाने जरा गती घेतली, की आपला घात निश्चित समजावा, अशी व्यथा त्यांनी क्लिपमध्ये मांडली आहे.

loading image
go to top