सोनईच्या तेजसचा नवा विक्रम सर्व विषयात मिळवले समान गुण

सुनील गर्जे
Thursday, 30 July 2020

शंभरपैकी शंभर गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षाही सर्व विषयात समान अन्‌ तेही 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच!

नेवासे (अहमदनगर) : शंभरपैकी शंभर गुण मिळवणे जेवढे अवघड त्यापेक्षाही सर्व विषयात समान अन्‌ तेही 35 गुण मिळवणे म्हणजे एक दिव्यच! पण हेच दिव्य सोनई (ता. नेवासे) येथील एका पठ्याने साध्य केले आहे. त्याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत मराठी असो वा इंग्लिश किंवा गणित असो वा विज्ञान सर्व विषयात 35 गुण मिळवून परफेटक्ट 35 गुणांचा मान मिळवलाय.

बुधवारी दहावीचे निकाल जाहीर झाले.  कोणी 100 टक्के गुण मिळवले तर कोणी काठावर पास झाले.  मात्र तेजस भास्कर वाघ (रा. हनुमानवादी, सोनई) या विद्यार्थ्याने सर्व विषयात ३५ मार्क मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
तेजस वाघ हा मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील श्री. शनिश्वर माध्यमिक विद्यालयात  दहावीचा विद्यार्थी आहे.  त्याच्या परफेटक्ट 35 ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

तेजसचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख,  सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्रशासन अधिकारी डॉ. अशोक तुवर, विद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सोनवणे, माजी प्राचार्य शशिकांत लिपाने यांनी अभिनंदन केले. 
दरम्यान तेजसचा हनुमानवाडी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते सुभाष राख यांच्या हस्ते व अभिजित राख, वैभव वाघ, राहुल राख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. त्याच्या अनेक मित्रांनी त्याच्यासह गुणपत्राचा फोटो व्हाट्सएप, स्टेटस, फेसबुक व्हायरल करून कौतुक केले. 

ऑनलाईन निकाल पाहिला आणि त्यात मला सर्व विषयात 35 गुण मिळून मी 35 टक्क्याने पास झालो. यावर प्रथम माझा विश्वासच बसेना. त्यामुळे तीन- चार वेळेस पुन्हा पाहिले तर तसेच यायचे.  मला किती मार्क पडले यापेक्षा मला सर्व विषयात समाणगुण पडले याचा खूप आनंद झाला. 
- तेजस वाघ, विद्यार्थी, सोनई 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejas Wagh from Sonai village got 35 percent marks in 10th