वेळ जाईल म्हणून टेम्पोतच कामगारांनी शिदोरी सोडली... थोड्या वेळातच पहिल्यादाच टेम्पोत बसलेला अभियंताही...

नीलेश दिवटे
Wednesday, 12 August 2020

चिंचोली काळदात चौफुल्यावर टेम्पो व कंटेनरची धडक झाली. या अपघातात दोघेजण जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील चिंचोली काळदात चौफुल्यावर टेम्पो व कंटेनरची धडक झाली. या अपघातात दोघेजण जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये कर्जत अमरापूर रस्त्यावरील कामावरचा एक अभियंता व एक मजुर आहे. बुधवारी (ता. १२) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.

या अपघातस्थळी रक्त व मांसाचा सडा पडला होता. दुपारची जेवणाची सुट्टी होती. मात्र वेळ जाईल म्हणून टेम्पोतच सर्वांनी आपली शिदोरी सोडली, अपघातस्थळी भाकरी व बटाट्याची भाजी विखुरली होती.

कर्जत ते अमरापूर रस्त्याचे काम सुरू असून चिंचोली काळदातपासून कर्जतच्या दिशेने काम संपून मालवाहतूक टेम्पोत टिकाव, फावडे, घमेले यासह सिमेंटच्या गोण्या टाकून पाच मजूर व देखभाल करणारा एक अभियंता असे सहाजण चिंचोली काळदाते येथून मिरजगावकडे निघाले. ते चौफुलीवर आल्यानंतर श्रीगोंदयाकडून जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यात टेम्पो पूर्ण गोल फिरला व क्लिनरच्या दिशेने पलटी झाला. 

त्यात पुढे बसलेले अभियंता व मजूर खाली सापडून जागीच ठार झाले. मागे बसलेले हे चौघे सिमेंट गोण्याखाली दबल्याने जखमी झाले आहेत. त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात संदीप दादाराव मिरेकर (वय २७, रा. मोरखेड, ता. मेखर, जि. बुलढाणा) व भिवाजी नागेंद्र जोंधळे (वय २६, रा. सोनपल्ली, ता. श्रीकोंडा, जि. आदीलाबाद) हे दोघे जागीच ठार झाले. विष्णू राम वेताळकर (वय २६) व विनोद सुभाष गुंजकर (वय २६, दोघे रा. उकळी), नितीन रामभाऊ हुलगुंडे (वय २१, रा. माजलगाव, जि. बीड) व गोपाळ अशोक पवार (वय २४, रा. भोदखेड, जि. बुलढाणा) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.  अपघात घडल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलिस कर्मचारी प्रमोद हंचे घटनास्थळी दाखल झाले. 

ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त टेम्पो व मृतदेह यंत्राच्या मदतीने काढण्यात आले. जामखेडकडे अपघात करून पळून जाणारा कंटेनर टाकळी खंडेश्वरी येथील तलावाच्या सांडव्या जवळ बेवारस स्थितीत आढळून आला आहे.

तालुक्यातील चिंचोली काळदात येथे कर्जत- नगर आणि त्याला छेदून जाणाऱ्या श्रीगोंदा- जामखेड जाणाऱ्या रस्त्यामुळे चौफुला बनला आहे. तो अत्यंत अपघात प्रणव बनला आहे. येथे आजपर्यंत २५ जणांना आपले प्राण गमवला आहे. शेकडो जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. येथे वर्तुळाकृती रस्ता (सर्कल) बनवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चिंचोली काळदातचे उपसरपंच रघुनाथ काळदाते यांनी केली आहे.

या अपघातात युवा अभियंता भिवाजी जोंधळे हे जागीच ठार झाले आहेत. ते मजुरासंवेत टेम्पोत कधीच बसत नाहीत. मात्र आज आग्रहाखातर ते बसले. टेम्पोत बसल्यानंतर त्यांनी खिडकीतून सर्वांना हात जोडून नमस्कार केला. तो शेवटचा ठरला. पाच मिनिटांत काळाने त्यांच्यावर झडप घातली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tempo and container accident at Chaufula during Chincholi period in Karjat taluka