एकाच कुटुंबातील दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; सोनईत आरोग्य तपासणी पूर्ण 

विनायक दरंदले 
Sunday, 12 July 2020

दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपुर्ण सोनई गावठाणातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. संशयित कुटुंब राहत असलेल्या गल्लीचे सर्व रस्ते प्रशासनाने रविवारी पुर्णपणे बंद केले आहेत. 

सोनई (अहमदनगर) : दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपुर्ण सोनई गावठाणातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. संशयित कुटुंब राहत असलेल्या गल्लीचे सर्व रस्ते प्रशासनाने रविवारी पुर्णपणे बंद केले आहेत. 
तीन दिवसापूर्वी एकाच कुटुंबातील 10 व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने 
हॉटस्पॉट जाहीर करत गावातील सर्व रस्ते व गल्लीबोळा सील केल्या होत्या. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.आरोग्य विभागाच्या वतीने गावात 11 पथक कार्यरत करण्यात आले असून पथकातील 50 जणांनी सोनई गावठाणातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी पुर्ण केली आहे. आज दुपारनंतर वाड्यावस्त्या वर राहत असलेल्या ग्रामस्थांची तपासणी सुरु करण्यात येईल असे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांनी सांगितले. 
संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या एकशे दोन व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी नेलेले असून या अहवाला 
बाबत ग्रामस्थात धाकधूक आहे. हॉटस्पॉटमुळे सध्या ग्रामस्थांना जीवनावश्‍यक वस्तूसाठी मोठा आटापिटा करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने अजून तरी दुध, भाजीपाला, किराणा व आवश्‍यक औषधे देण्याचे नियोजन केलेले नसल्याने नाराजीचा सूर झाला आहे. 

कुणीतरी मदत करा हो.... 
गावातील टकारगल्ली,संत सावतागल्ली व संत सेना महाराज गल्ली प्रशासनाने सील केली मात्र या गल्लीत जीवनावश्‍यक वस्तू पोच करण्याचे नियोजन केलेले नाही.या भागातील ग्रामस्थांनी कुणीतरी आम्हाला मदत करा हो.. अशी ओरड सोशलमिडीयावर सुरु केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten people from the same family corona positive patient in sonai