भाव पडले तरी कांदा लागवडीचा नाद सुटेना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

कांदा लागवडीसाठी यावर्षी महागडे कांदा रोप खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

नगर ः यंदा पाऊस चांगला पडला. शेतकऱ्यांच्या विहीरी तुडूंब भरल्या. या पाण्याचा उपयोग नगदी कांदा पिकाला व्हावा, यासाठी या भागातील शेतकरी उन्हाळी कांदा पीक लागवडीच्या कामाला लागला आहे. कांद्याचे भाव पडले तरी शेतकरी लागवड करण्यापासून मागे हटत नाही.

कांदा लागवडीसाठी यावर्षी महागडे कांदा रोप खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यावर्षी कांदा पिकाला फारसा भाव मिळाला नाही. परंतु, पुढील वर्षी कांदा पिकाला चांगला भाव मिळेल या आशे पोटी शेतकरी कांदा पिके घेत आहेत.

दरवर्षी कांदा लागवड डिसेंबर आखेर संपत असती. परंतु, यावर्षी परतिच्या पावसाने पिच्छा सोडला नाही. त्यामुळे कांदा रोपे ऊशीरा टाकली गेली. काही शेतकऱ्यांची रोपे अजुनही लागवडीसाठी आलेली नाहीत. त्यामुळे जानेवारी अखेर पर्यंत यावर्षी कांदा लागवड सुरु राहणार असल्याचे शेतकरी सांगतात.

गंगाकाठ लाभलेल्या रस्तापुर भागात कांदा लागवडी सुरु झाल्या आहेत. यावर्षी बराच काळ पाऊस पडत होता त्यामुळे मजुरांना काम नव्हते. परंतु, कांदा रोपे तयार झाली आहेत. त्यामुळे मजुरांची कमतरता भासू लागली. नऊ हजार रुपये एकर कांदा लागवडीसाठी मजुर दाम मागत आहेत.

पाणी भरणे, औषधे फवारणी, कांदा देखभाल, कांदा काढणी यासाठी मोठा खर्च लागतो. एवढे असुनही पुढील वर्षी कांद्याला भाव मिळेल याच आशेवर शेतकरी कांदा लागवड करीत आहेत.

शिवाय कांदा हे नगदी पीक आहे. कमी कालावधीत दोन पैसे लवकर हातात येतात. ही भावना बाळगुन कांदा पीक घेतले जाते असे शेतकरी सांगतात. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tendency of farmers towards onion cultivation at Puntambe