
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली.
नगर : बहुचर्चित जवखेडे हत्याकांड खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. सरकार पक्षातर्फे आतापर्यंत 52 साक्षीदार तपासले असून, मुख्य तपासी अधिकाऱ्यांची साक्ष सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे 20 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या हत्याकांडाने जिल्ह्यासह राज्य हादरले.
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. काहींची मानसशास्त्रीय चाचणी केली. मात्र, आरोपी सापडत नव्हते.
हेही वाचा - वर्धमान पतसंस्थेत अपहार, अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा
पोलिसांचा फिर्यादी प्रशांत दिलीप जाधव याच्यावरच संशय बळावल्यावर त्याची चौकशी व मानसशास्त्रीय चाचणी केली. त्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला. नंतर पुराव्याच्या आधारे फिर्यादी प्रशांत जाधव याच्यासह अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव यांना आरोपी केले. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपीच्या नात्यातीलच हत्या झालेले होते. या हत्याकांडाचे कारणही चक्रावून टाकणारे होते.
गेल्या सहा वर्षांपासून प्रधान जिल्हा न्यायाधीशांसमोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे. खटल्यादरम्यान आतापर्यंत पाच न्यायाधीश बदलले. खटल्याचे कामकाज आता शेवटच्या टप्प्यात आले आहे.
सरकार पक्षातर्फे सुमारे 200 पैकी महत्त्वाच्या 55 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येणार होत्या. पैकी 52 साक्षीदारांची तपासणी झाली आहे. मुख्य तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांची सरतपासणी झाली असून, उलटतपासणी बाकी आहे. येत्या 10 व 11 फेब्रुवारी रोजी खटल्याची सुनावणी होणार आहे. सरकार पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव पाटील बाजू मांडत आहेत.
यांनी केला तपास
संवेदशील जवखेडे हत्याकांडाचा तत्कालीन पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील व सुनील पाटील, पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी तपास केला. सहायक तपासी अधिकारी म्हणून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र ढवळून निघाला
जवखेडे हत्याकांडानंतर महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघाले होते. विविध पक्ष, संघटनांनी आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने केली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी भेटी देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले होते.
मृतांना न्याय देण्यासाठी खटल्यात भक्कम पुराव्यांची साखळी मांडली आहे. आरोपींना कठोर शासन होईल, यासाठी आशादायी आहोत.
- ऍड. उमेशचंद्र यादव पाटील, राज्याचे विशेष सरकारी वकील