esakal | श्रीगोंद्यात डॉक्टरही मिळेनात, समाजसेवकांनीही टेकले हात

बोलून बातमी शोधा

DOCTOR
श्रीगोंद्यात डॉक्टरही मिळेनात, समाजसेवकांनीही टेकले हात
sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. काल गुरुवारपर्यंत 764 ऍक्‍टिव्ह रुग्ण असून, वीस दिवसांत 63 जणांचा बळी कोरोनाने घेतल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, शहरासह गावोगावी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय सुविधा देणाऱ्यांची वानवा भासत असून, डॉक्‍टर व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी, हवा तेवढा पगार कबूल करूनही मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

तालुका कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकवटला असतानाच आता नवे संकटे समोर येत आहेत. अनेक गावांनी कोरोना सेंटर सुरू केली. ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करतानाच सुविधाही उपलब्ध करण्यात त्या-त्या गावांतील प्रमुखांनी वाटा उचलला आहे.

कोरोनाला हरविण्याची जिद्द धरत समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रातील लोक यात उतरल्याचे चित्र असतानाही, सध्या तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच आहे. यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. प्रशासनाकडून समजलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिलपासून कालपर्यंत तालुक्‍यात 63 जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. म्हणजे साधारणपणे दिवसाला तीनपेक्षा अधिक जणांचा बळी जात आहे.

तालुक्‍यात सुरू असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असतानाच डॉक्‍टर व त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मिळत नसल्याचे वास्तव आहे. काही गावांनी स्थानिक डॉक्‍टरांच्या पुढाकारातून कोविड सेंटर सुरू केली. तेथे या अडचणी सध्या नाहीत. अनेक ठिकाणी डॉक्‍टर नसल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्‍यता आहे.

प्रशासनाने यातून मार्ग काढण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, कोविड सेंटरला दानशूर लोक मोठी मदतही करीत आहेत. मात्र, आता "पैसा नको तर डॉक्‍टर नावाचे देवदूत पाहिजेत,' असे हताशपणे केंद्रसंचालक बोलत आहेत. अनेक ठिकाणी "मागाल तेवढा पगार मिळेल' असे आश्वासन दिल्यानंतरही कोविड सेंटरला जाण्यास कोणी तयार होत नसल्याचे समजते.

तहसीलदार प्रदीपकुमार पवार म्हणाले, ""डॉक्‍टर मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत. आमचा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. खासगी डॉक्‍टर मदत करीत असले, तरी त्यांच्याकडून जास्त मदतीची गरज आहे.''

खासगी डॉक्‍टर तयार; पण...

शहरासह तालुक्‍यातील खासगी डॉक्‍टर कोविड सेंटरला जास्तीची मदत करण्यास तयार आहेत; मात्र त्यांना प्रशासन विश्वासात न घेता कायद्याचा धाक दाखवीत असल्याची चर्चा आहे. आरोग्य उपकेंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्‍टर यांच्याही कामाची व सेवेची सांगड घालून प्रशासनाला तातडीने यावर निर्णय घ्यावा लागणार आहे.