गावकऱ्यांच्या स्वयंंशिस्तीपुढे कोरोनाने टेकले हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना व्हायरस

गावकऱ्यांच्या स्वयंशिस्तीपुढे कोरोनाने टेकले हात

जामखेड : तालुक्‍यातील हळगाव येथे महिनाभरापूर्वी कोरोनाने सुरू झालेले मृत्यूचे तांडव आता थांबले आहे. पंधरा दिवसांत अठरा मृत्यू पाहिलेल्या येथील तरुणाईने, एकजुटीने गाव बंद ठेवण्याच्या निर्णयाला साथ देत काटेकोरपणे नियमांचे पालन केले. (The death toll in Halgaon has come down)

स्वयंशिस्त, शांतता व संयम या त्रिसूत्रीच्या बळावर संकटावर मात केली. ग्रामस्थांच्या स्वयंशिस्तीपुढे आता कोरोनानेही माघार घेतली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

हेही वाचा: अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी

हळगाव येथे कोरोनाने पंधरा दिवसांपूर्वी अक्षरशः थैमान घातले होते. घराघरांत बाधित आढळत होते. कोरोनामुळे गावातील कर्तीसवरती 18 माणसे मृत्युमुखी पडली. तरुणाईने हे दुःख पचवत संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी "गाव बंद'ची हाक दिली. मात्र, काही बेफिकीर व्यक्तींनी हा निर्णय पायदळी तुडवला. त्याची किंमत गावकऱ्यांना चुकवावी लागली. गावातील विदारक स्थिती "सकाळ"ने सर्वांसमोर आणली. त्यानंतर गावात बदल घडत गेला.

गावातील तरुणाईच्या पुढाकाराने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाली. गावातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य झाले. काहींनी शेताची वाट धरली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले गेले. बाधित रुग्णांच्या संपर्कातील 260 व्यक्तींनी स्वतः पुढे येऊन, कोरोना तपासणी करून घेतली.

अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांनी स्वतःची काळजी घेतली. शेतात विलगीकरण करून घेतले. युवाशक्ती ग्रामसुरक्षा समितीने ग्रामस्थांचे प्रबोधन केले. आमदार रोहित पवार यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे व आरोग्य विभागाला कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर गावातील मृत्यूचे तांडव थांबले. आता ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा आहे.

महिला पदाधिकारी-कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान!

सरपंच अनिता ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक नीलिमा कुबसंगे, समुदाय आरोग्य अधिकारी संजीवनी बारस्कर, आरोग्यसेविका राणी नागरगोजे, आशासेविका छाया कापसे, हाजरा शेख, सुनीता रंधवे या महिला कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यासाठी चार दिवस शिबिर घेतले. त्यांना तलाठी प्रफुल्ल साळवे व पोलिस पाटील सुरेश ढवळे यांची साथ मिळाली. (The death toll in Halgaon has come down)

Web Title: The Death Toll In Halgaon Has Come

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar
go to top