एकमेकांवर उगारलेले हात मैत्रीसाठी सरसावले! पीआय करेंची करामत

nevase
nevase
Updated on: 

कुकाणे : स्मशानभूमी व कब्रस्थानच्या जागेवरून एका दशकापासून धुमसत असलेला दोन समाजातील विकोपाचा वाद पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या यशस्वी मध्यस्थीने कायमचा मिटला आणि भविष्यातील मोठा अनर्थ टळला. वर्षानुवर्षे एकमेकांवर उगरणारे हात 'करें'मुळे मैत्रीसाठी सरसावल्याचे उपस्थितांनी अनुभवले.

nevase
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

गेले अनेक वर्षे धुमसत असलेला हा वाद सरकारी यंत्रणेने मनावर घेतल्याने जागेचा वाद जागेवरच शमल्याने गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. केवळ दंडूका वापरूनच नव्हे तर सामोपचारानेही वाद मिटवता येतो, हे सरकारी यंत्रणेने दाखवून दिले. जेऊर हैबती येथे गेल्या दहा वर्षांपासून सरकारी जागेवरील स्मशानभूमी व कब्रस्थानचा वाद अनेकदा ग्रामस्थ, सरकारी यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, राजकीय कार्यकर्ते यांनी बैठका घेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबण्याऐवजी हा वाद तेवतच राहिला. पुढे पोलिस ठाण्यात केसेस, न्यायालयात वाद गेले. दोन समाजातील या वादाने या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न केंव्हा निर्माण होईल याचा नेम नसे.

गेल्या महिन्यात  याच जागेवरून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांचेकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी गेल्या. करे यांनी त्याच वेळी या गावात बैठक घेतली पण पहिल्या बैठकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर गेल्या आठवडयात हा वाद पुन्हा उफाळून आल्याने हा वाद मिटवण्याचा चंगच करे यांनी बांधला.

पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, गट विकास अधिकारी शेखर शेलार यांना सोबत घेत प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. नेमकी परिस्थिती काय हे जाणून घेत जागेवरच दोन्ही समाजांचे समुपदेशन केले. एकीकडे सामंजस्य तर दूसरीकडे कायद्याचा धाकही बोलून दाखवला. काही तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते, त्यांना भांडण, मारामारीने होत असलेल्या नुकसानीची कल्पना दिली. दुपारी ३ वाजता आलेली सरकारी यंत्रणा येथील वाद मिटवण्यासाठी तब्बल रात्रीचे साडेसात वाजेपर्यंत येथेच तळ ठोकून होती. त्याचवेळी दोन्ही समाजाला मान्य होईल, असा तोडगा निरीक्षक करे यांनी काढला.

तो दोन्हीकडूनही बराच खल झाल्यानंतर मान्य होताच, त्या जागेवर वरील तीनही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लक्ष्मणरेषा आखून दिली. एकमेकांनी या रेषेचे पालन करावे, असा सल्ला अन दमही भरण्यात आला.

वाद मिटल्याचे समाधान

"वर्षानुवर्षे असलेला हा स्मशानभूमी व कब्रस्थानचा वाद दोन्ही समाजाने घेतलेल्या समंजसपणामुळे मिटल्याने याचा मला मनस्वी आनंद झाला. यासाठी दोन्ही समाजातील प्रमुखांबरोबरच प्रमुख ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची होती.

- विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com