esakal | पाथर्डी होणार पुढचे दहा दिवस लॉकडाउन

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन
पाथर्डी पुढचे दहा दिवस लॉकडाउन
sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी ः शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांच्या "ब्रेक द चेन'साठी (Break the chain) तालुक्‍यासह शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. सहा) 16 मेपर्यंत होणार आहे. संपूर्ण तालुक्‍यात "जनता कर्फ्यू' जाहीर करण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. (The lockdown will take place in Pathardi till May 16)

तहसील कार्यालयात काल (मंगळवारी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण (devdatta kekan) होते. या वेळी तहसीलदार श्‍याम वाडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नायब तहसीलदार पंकज नेवसे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे, डॉ. जगदीश पालवे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सध्या ज्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत, त्यांचा उपयोग होत नसल्याने कडक "लॉकडाउन' करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत तहसीलदार श्‍याम वाडकर यांनी बैठकीत व्यक्त केले. सर्वांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील ज्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे, त्या व्यक्तीचे नाव पालिका प्रशासनाला कळविण्यात येणार असून, बाधित आढळलेल्या रुग्णाला कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटलमध्येच उपचार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. "जनता कर्फ्यू'च्या काळात अनेक वेळा रूट मार्च काढण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दूध व भाजीपाल्यावरही निर्बंध

शनिवार व रविवार (sunday) वगळता इतर दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, दूध विकण्यास परवानगी देण्यात आली होती. खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. "जनता कर्फ्यू'च्या कालावधीत दूधविक्रेत्यांना एकाच ठिकाणी थांबून दूधविक्री करता येणार नाही, तर इतर दुकाने बंद राहणार आहेत.

हे सुरू; पण ही बंधने

औषध दुकाने, दवाखाने व हॉस्पिटल सुरू ठेवण्यात येणार आहेत. औषधे वगळता इतर वस्तू दुकानात विकता येणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

(The lockdown will take place in Pathardi till May 16)