एकाच बंगल्यात तिसऱ्यांदा चोरी; नेले काय तर टीव्ही

शांताराम जाधव
Wednesday, 28 October 2020

धुमाळवाडीतील बंगल्यात तिसऱ्यांदा चोरी झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या धुमाळवाडीतील उद्योजक बाळासाहेब देशमुख यांच्या बंगल्यात झालेली ही तिसरी चोरी आहे.

बोटा (अहमदनगर) : धुमाळवाडीतील बंगल्यात तिसऱ्यांदा चोरी झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या धुमाळवाडीतील उद्योजक बाळासाहेब देशमुख यांच्या बंगल्यात झालेली ही तिसरी चोरी आहे. मंगळवारी (ता. २७) पहाटे हा प्रकार घडली आहे. घारगाव पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

डोळासणे गाव अंतर्गत येणाऱ्या धुमाळवाडी या ठिकाणी बाळासाहेब देशमुख यांचा बंगला आहे. देशमुख नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. 

बंगल्यातील लोखंडी कपाटातील साहित्याची उचक पाचक केली. घरातील टीव्ही, सेट अपबॉक्स अशा साहित्यांची चोरी केली. जाताना चोरट्यांनी सीसी टिव्ही कॅमेऱ्याचे नुकसानही केले. ही घटना शेजारीच राहणारे रावसाहेब भुजबळ यांच्या सकाळी लक्षात येताच त्यांनी देशमुख यांना कळविले. याप्रकरणी बाळासाहेब देशमुख यांचा मुलगा मंदार देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलिस हेडकॉन्सटेबल आदिनाथ गांधले करत आहेत. 

दरम्यान यापूर्वीही दोनदा याच बंद बंगल्यात चोरी झाली होती. दिपावलीच्या पार्श्वभूमीवर चोरींची मालीका सुरू झाल्याने संगमनेर तालुक्याच्या पठार भागात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at Balasaheb Deshmukh bungalow in Dhumalwadi