भुरट्याने पोल्ट्रीची जाळी उचकटून केली गावरान कोंबड्यांची चोरी

गौरव साळुंके
Friday, 4 December 2020

खोकर शिवारात पोल्ट्रीची जाळी उचकटून अज्ञात चोरट्यांनी ३६ गावरान कोंबड्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील खोकर शिवारात पोल्ट्रीची जाळी उचकटून अज्ञात चोरट्यांनी ३६ गावरान कोंबड्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परीसरातील पोल्ट्री व्यावसायीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

खोकर- अशोकनगर रस्ता शिवारातील समीर पठाण यांचा पोल्ट्रीचा व्यावसाय असून ते गावरान कोंबड्यांचे पालन करतात. तसेच परीसरातील अनेक शेतकर्यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी शिवारात पत्र्याचे शेड उभारले आहेत. कोरोनानंतर गावरान कोंबड्या आणि अंड्ड्यांची मागणी वाढल्याने पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळाली. असताना अज्ञात चोरट्यांनी काल मध्य रात्रीच्या सुमारास पठाण यांच्या पोल्ट्रीच्या शेडची जाळी उटकटून पोल्ट्रीत प्रवेश करुन ३६ गावरान कोंबड्या लंपास केल्या. सद्या थंडीची चाहुल लागली असून थंडीत गावरान कोंबडीच्या चिकनला मोठी पसंती मिळते.

त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या आंधाराची संधी साधुन कोंबड्यांची चोरी केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याप्रकरणी समीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी गेलेल्या ३६ गावरान कोंबड्यांची किंमत बारा हजार रुपये असल्याचे पठाण यांनी फिर्यादीत नमुद केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात लहान-मोठ्या चोरीचे प्रकार वाढले असून खोकर परिसरातील युनूस पठाण यांच्या घरासमोरील रात्री शेळी चोरी गेल्याची घटना यापुर्वी घडली होती. खोकर परिसरासह तालुक्यात अनेक भागात पोल्ट्रीचा व्यावसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पोल्ट्रीच्या शेडची जाळी उटकटून कोंबड्यांची चोरी झाल्याने पोलीसांनी तातडीने अज्ञात चोरट्यांचा तपास घेवुन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.

तालुक्यातील खोकर शिवारात गावरान कोंबड्या चोरी गेल्याची माहिती मिळाली आहे. अज्ञात चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास सदर चोरीचा प्रकार केल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. चोरीचा तपास करुन संबधीत चोरट्यांचा लवकरच गजाआड केले जाईल. 
- मसूद खान, पोलिस निरिक्षक, तालुका पोलिस ठाणे, श्रीरामपूर
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of hens from poultry in Shrirampur taluka