माजी मंत्र्यांच्या वस्तीवर चोरांचा धुमाकूळ, दगडफेक करीत केली चोरी

मनोज जोशी
Thursday, 31 December 2020

सुरक्षारक्षकाने सायरन वाजवला. त्यामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले. त्यामुळे चोरांनी सुरक्षारक्षकावर दगडफेक सुरू केली.

कोपरगाव : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या येसगाव येथील वस्तीवर चंदन चोरीतील टोळीने दगडफेक केली. चंदनाच्या झाडाची कत्तल करीत ते लंपास केले. युवा नेते सुमित कोल्हे यांनी प्रतिहल्ला करीत चोरांना पिटाळून लावले. आज पहाटे हा प्रकार झाला.

याबाबत सुरक्षारक्षक घनश्‍याम पोपट नेटके (रा. खिर्डी गणेश) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात पाच चोरांनी 15 हजार रुपये किमतीचे चंदनाचे खोड चोरल्याची तक्रार केली आहे.

पोलिस निरीक्षक दौलत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. झाड कापण्यासाठी वापरलेली करवत, दोरी, लाकडी दांडे तेथे आढळून आले.

येसगाव येथील कोल्हे यांच्या वस्तीवर आज पहाटे आठ-दहा चोरटे सुरक्षारक्षकांची नजर चुकवून घरामागील चंदनाचे झाड कापत होते. झाड जमिनीवर कोसळताना मोठा आवाज झाला. त्यामुळे सुरक्षारक्षकासह कोल्हे परिवारातील सर्व जण जागे झाले.

सुरक्षारक्षकाने सायरन वाजवला. त्यामुळे परिसरातील नागरिक सतर्क झाले. त्यामुळे चोरांनी सुरक्षारक्षकावर दगडफेक सुरू केली. चोरांशी दोन हात करण्यासाठी सुमित कोल्हे पुढे सरसावले. तीन सुरक्षारक्षकांसह त्यांनी चोरांवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे गोदावरी डाव्या कालव्याच्या झाडीतून अंधाराचा फायदा चोर पसार झाले. जाताना त्यांनी चंदनाच्या झाडाचा बुंधा लंपास केला. अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft at the house of former minister Shankarrao Kolhe