
""कोरोना संकटाच्या काळात मौन धारण केल्याने शांती मिळते, या दृष्टीने आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शक ठरतील अशी तीन पुस्तके दिली. मात्र, त्याकडे त्यांनी पाठ फिरवून केवळ सरकारवर तोंडसुख घेतले. दिलेल्या पुस्तकांचा त्यांना उपयोग झाला नाही,'' अशी उपहासात्मक टीका मुश्रीफ यांनी केली.
नगर ः ""एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देशात कोरोनासंदर्भातील परिस्थिती अन्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचे वारंवार सांगतात. दुसरीकडे, यांच्याच पक्षातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सरकार सपशेल अपयशी ठरल्याची टीका करतात. कोण खरे बोलतात आणि कोण खोटे, हा प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षाने देव पाण्यात घातले आहेत,'' अशी टीका ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.
हेही वाचा ः चिनी ड्रॅगनला भारतीय मार्केटमधून असे हुसकावता येईल...रोहित पवारांनी दिला उतारा
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन-प्रशासन अहोरात्र लढत आहे; परंतु विरोधी पक्ष केवळ सरकार अडचणीत आणण्याचाच प्रयत्न करतात. कोरोनाबाधितांचे आकडे कमी झाले तरी विरोधकांच्या पोटात गोळा येतो.''
अवश्य वाचा ः काय करावं...या शाळांकडून सुरू झाली "पठाणी वसुली'...प्रवेश रद्दसाठी धमकी
""कोरोना संकटाच्या काळात मौन धारण केल्याने शांती मिळते, या दृष्टीने आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शक ठरतील अशी तीन पुस्तके दिली. मात्र, त्याकडे त्यांनी पाठ फिरवून केवळ सरकारवर तोंडसुख घेतले. दिलेल्या पुस्तकांचा त्यांना उपयोग झाला नाही,'' अशी उपहासात्मक टीका मुश्रीफ यांनी केली.
पवार कोकणात तळ ठोकून
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार कोकणात तळ ठोकून आहेत. नागरिकांना दिलासा देत आहेत. कोकणवासीयांचे जीवन पुन्हा उभारले जाईल, यासाठी राज्य सरकार आवश्यक ती मदत करील, असा निर्वाळा मुश्रीफ यांनी दिला.
"कुकडी'संदर्भात निव्वळ राजकारण
मुश्रीफ म्हणाले, ""कुकडी धरणाच्या पाण्याबाबत विरोधकांकडून केवळ राजकारण सुरू आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विरोधकांनी उगीच राजकारण करू नये. काही अडचण असल्यास एक फोन करावा; समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.''
मुश्रीफ म्हणाले...
- स्वस्त धान्य दुकानदारांनाही मागणीप्रमाणे कोरोना परिस्थितीत 50 लाखांचा विमा देणार.
- मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार.
- सलून बंद असल्याने नाभिक समाजाला योग्य ती मदत केली जाईल.
- जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध. खरीप पेरणीसंदर्भात जिल्ह्यात काटेकोर नियोजन.
- एक जूनला जिल्हा कोरोनामुक्त होईल, असे वाटले होते; मात्र त्यास नजर लागली. आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन केले, तर जिल्हा लवकर कोरोनामुक्त होईल.