शेवगाव तालुक्यात ‘एवढ्या’ गावात आहेत कोरोनाबाधीत रुग्ण

सचिन सातपुते
Sunday, 9 August 2020

सुरुवातीला तीन महिने कोरोनामुक्त असलेल्या शेवगाव तालुक्यात काही दिवसापासून बाधीतांची संख्या वाढत चालली आहे.

शेवगाव (अहमदनगर) : सुरुवातीला तीन महिने कोरोनामुक्त असलेल्या शेवगाव तालुक्यात काही दिवसापासून बाधीतांची संख्या वाढत चालली आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावात झालेल्या या कोरोनाच्या शिरकावामुळे प्रशासन व नागरीकांपुढील आवाहन वाढले आहे. 

सद्यस्थितीत शहरात 71 तर तालुक्यात 70 असे 141 रुग्ण असून 135 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. शहरासोबतच ग्रामिण भागातील 23 गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून वाढत्या रुग्ण संख्येने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले असतांना जूनपर्यंत तालुका कोरोनामुक्त होता. आजुबाजूच्या पाथर्डी, नेवासे, तालुक्यासह जिल्हयात रुग्णांची संख्या वाढत असताना तालुका मात्र त्यापासून लांब होता. पुणे, मुंबईसह बाहेरच्या जिल्हयातून येणाऱ्या नागरीकांच्या संख्या वाढत गेल्याने जूनमध्ये पहील्यांदा कोरोनाचा तालुक्यात प्रवेश झाला. चाकण येथून ढोरजळगाव येथे आलेला एक तरुण बाधित आढळल्यानंतर दोन महिने रुग्णांची संख्या वाढत आहे. 

सुरुवातीला प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना चाचणीसाठी व उपचारासाठी नगर येथे पाठवले जात होते. त्यात वेळ जास्त जावून प्रशासनाची धावपळ होत होती. आता चाचण्यांची व उपचाराची सोय शेवगाव येथे उपलब्ध झाली. तरी काही दिवसात रुग्ण संख्या मात्र झपाटयाने वाढत आहे. तर रँपिड अँन्टीजेन टेस्ट शेवगाव येथे सुरु झाल्यापासून शहराबरोबरच ग्रामीण भागातही बाधितांच्या संख्येचा आलेख वाढतच आहे. 

तालुक्यातील शेवगाव शहरात 71 तर त्या खालोखाल कांबी 29, आव्हाणे बुद्रुक 15, वडुले खुर्द 18, बोधेगाव व पिंगेवाडी प्रत्येकी दोन, हातगाव, दहिगाव ने, अमरापूर, मडके प्रत्येकी एक असे 141 जण सदयस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. तर 14 गावातील रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शहरातील तीनजणांचा कोरोनामुळे मृत्य झालेला आहे. तर 1878 व्यक्तींची चाचणी घेण्यात आलेली आहे. 

तालुक्यातील वेगवेगळ्या गावामध्ये बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना नागरीक मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. मास्क न वापरणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, शारिरीक अंतर न पाळणे अशा हलगर्जीपणामुळे सातत्याने रुग्ण वाढत आहेत. याबाबत प्रशासनाबरोबरच नागरीकांनीही गांभिर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यात संसर्गाचा मोठा उद्रेक होवू शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

येथे आहे उपचारासाठी जागा 
तालुक्यातील रुग्ण संख्या वाढत असतांना प्रशासन मात्र सतर्क असून आरोग्य विभाग, महसूल, नगरपरीषद व पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे बाधीत रुग्णांना उपचारासाठी व संपर्कातील व्यक्तींना चाचणी व विलगीकरण सुविधा उपलब्ध होण्यास फारशा अडचणी येत नाहीत. त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलात रँपीड अँटीजन टेस्ट व रुग्णांसाठी विलगीकरण सुविधा तर प्रवरा शैक्षणिक संकुलात उपचारासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are corona positive patients in 23 villages in Shevgaon taluka