Ahmednagar : शहरातील विकासकामांत तडजोड नाही ; आमदार संग्राम जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार संग्राम जगताप

शहरातील विकासकामांत तडजोड नाही ; आमदार संग्राम जगताप

अहमदनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस कचरामुक्त शहर विभागात थ्री-स्टार मानांकन मिळाले. शहरात सुरू केलेल्या घंटागाड्या, कचराकुंडीमुक्ती, नियमित सफाई आदींमुळे हे मानांकन मिळाले. त्याचबरोबर शहरात डीपी रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांचीही कामे जोरात सुरू आहेत. विकासकामांत तडजोड होणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सावेडीतील कॉटेज कॉर्नर येथील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांनी प्रभागातील ५०० रोपांच्या लागवडीनंतर त्यांना ट्री-गार्ड बसविण्याच्या कामास त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे उपस्थित होते. येथील महापालिकेच्या उद्यानाची आमदार जगताप यांनी पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांतर्फे बाळासाहेब जाधव यांनी त्यांचा सत्कार केला.

आमदार जगताप म्हणाले, की पाणी व ड्रेनेजची सर्व कामे मार्गी लावून रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. विकासाची दर्जेदार कामे हाच आमचा अजेंडा आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी काम करीत आहोत. विशेष करून वृक्षारोपण मोहीम उपनगरात सुरू आहे. संपूर्ण शहरात पथदिव्यांचेही काम लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न मांडून एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरणासाठी प्रयत्न करू.

कोरोनात सेवा बजावताना ३०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३८ कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रासातून आत्महत्या केली. शेतकऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. शहरासह उपनगरांतील पाच प्रमुख रस्त्यांसाठी १० कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने ही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व सागर बोरुडे यांनी प्रभाग एकमध्ये झालेल्या विकासकामांविषयी माहिती दिली.

संपूर्ण शहरात वेगाने पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. दीपावलीनंतर आता कामगारांची उपलब्धता होऊन हे काम अधिक वेगाने होईल. कंपनीला केवळ तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्याआधीच कामे संपविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

- संग्राम जगताप, आमदार

प्रभागात विकासकामांबरोबरच पर्यावरण संतुलनाचे काम सुरू आहे. वृक्षारोपण व संवर्धन गरजेचे आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून स्वच्छ, सुंदर, हरित नगर संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असून, प्रभागात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ट्री-गार्डसह ५०० रोपांची लागवड सुरू आहे.

- संपत बारस्कर, विरोधी पक्षनेते, महापालिका

loading image
go to top