महापालिकेच्या २२ घटागाड्यांमध्ये झाला बिघाड

अमित आवारी
Sunday, 18 October 2020

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यात 64 घंटागाड्यांची खरेदी केली होती. लॉकडाउनमध्ये जुलै महिन्यापर्यंत या वाहनांचा वापरच झाला नाही. ऑगस्ट महिन्यापासून या वाहनांचा वापर सुरू झाला. 

नगर ः महापालिकेच्या घनकचरा विभागाने सात महिन्यांपूर्वी 64 नवीन घंटागाड्यांची खरेदी केली. यातील 22 वाहनांत डंपिंग ऍडजेस्टमेंटची समस्या निर्माण झाली आहे. घटकचरा व्यवस्थानासाठीच्या ठेकेदाराने या घंटागाड्या महापालिकेल्या परत दिल्या आहेत. त्यामुळे ही वाहन खरेदी महापालिकेसाठी नवीन डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यात 64 घंटागाड्यांची खरेदी केली होती. लॉकडाउनमध्ये जुलै महिन्यापर्यंत या वाहनांचा वापरच झाला नाही. ऑगस्ट महिन्यापासून या वाहनांचा वापर सुरू झाला. 

महापालिकेने 64 नवीन घंटागाड्या खरेदी केल्या त्यातील 2 नवीन घंटागाड्या कोंडवाडा विभागाला देण्यात आलेल्या आहेत. 62 वाहने घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी ठेकेदार संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्टकडे आहे. 20 वाहने स्वयंभूची स्वतःची आहेत. या शिवाय महापालिकेचे 5 कॉम्पेक्‍टर व स्वयंभूचा एक कॉम्पेक्‍टर सध्या घनकचरा व्यवस्थापनाचे काम करतो. 

महापालिकेने "स्वयंभू'ला दिलेल्या 62 घंटागाड्यांपैकी 22 घंटागाड्यांच्या डंपिंग ऍडजेस्टमेंटमध्ये समस्या आल्या आहेत. या समस्येमुळे घंटागाड्या उलटण्याचीही शक्‍यता आहे. ही 22 वाहने तातडीने दुरूस्त करावीत या मागणीची चार पत्रे ठेकेदार संस्थेने महापालिकेला दिली आहेत. मात्र वाहने दुरूस्त होत नसल्याने ही 22 वाहने ठेकेदार संस्थेने महापालिकेला परत केली आहेत. त्या जागी शहरातील कचरा उचलण्यासाठी स्वतःची वाहने वापरात आणण्यास सुरवात केली आहे. 

या संदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत वाहन खरेदी व वाहनांच्या बिघाडा संदर्भातील सर्व कागदपत्रे आठवड्या भरात सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

बैठकीनंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने वाहन देणाऱ्या संस्थेशी संपर्क करून डंपिंग ऍडजेस्टमेंट दुरूस्त करण्यास सांगितले आहे. 

महापालिकेने दिलेल्या नवीन 62 घंटागाड्यांपैकी काही घंटागाड्यांमध्ये डंपिंगची समस्या आहे. त्यामुळे आम्ही समस्या असलेली वाहने महापालिकेला परत केली आहेत. त्या जागी आमची वाहने काम करत आहेत. 
- दुर्योधन भापकर, संचालक, स्वयंभू ट्रान्स्पोर्ट 

महापालिकेच्या नवीन घंटागाड्यांपैकी 22 घंटागाड्यांचे डंपिंग ऍडजेस्टमेंट योग्य झालेले नाही. या संदर्भात वाहने खरेदी केलेल्या संस्थेशी संपर्क साधला आहे. वाहनांतील डंपिंग समस्या दुरूस्त करून देण्यासाठी तीन ते चार दिवसांत ते अभियंते पाठवून देणार आहेत. 
- के.के. देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका, अहमदनगर. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was a breakdown in 22 NMC vehicles