आवई होती बिबट्याची, निघाले रानमांजर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, निसर्गमित्र मंदार साबळे, वनरक्षक कानिफ साबळे, तय्यब शेख, चालक अक्षय ससे आदी घटनास्थळी दाखल झाले.

नगर ः बिबट्याच्या आवईमुळे जिल्हा हादरून गेला आहे. कधी नव्हे ते कर्जत तालुक्यातही हे पेव आले आहे. रात्रीस पाणी भरण्यासही शेतकरी धजावत नाहीत.

बिबट्याच्या धास्तीने चांदबीबी महालाच्या जवळपास असलेल्या अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जांब (ता. नगर) गावातील एका शेतातील झाडावर बिबट्याचे बछडे असल्याची आवई उठली. ती गावभर पसरली. त्यामुळे बछडे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

बिबट्याची मादी तेथे असण्याची शक्‍यता असल्याने, झाडाजवळ कोणी जात नव्हते. याची माहिती उपसरपंच प्रवीण पवार व सामाजिक कार्यकर्ते संतोष कर्पे यांनी तातडीने वन विभागास दिली.

वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, निसर्गमित्र मंदार साबळे, वनरक्षक कानिफ साबळे, तय्यब शेख, चालक अक्षय ससे आदी घटनास्थळी दाखल झाले.

या पथकाला झाडावर काही तरी बसल्याचे जाणवले. मंदार साबळे यांच्यासह वनाधिकाऱ्यांनी झाडाजवळ पाहणी केली तेव्हा रानमांजर बसलेली दिसून आली. साबळे व इतरांना पाहताच तिने धूम ठोकली. 
अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was a rumor of a leopard