स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्याला पोलिसांनी गोव्यात पकडले

आनंद गायकवाड
Friday, 30 October 2020

स्वतःच्या घरात दागिन्यांसह सव्वातीन लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारून, ते नाशिकमध्ये विकणाऱ्याला त्याच्या मित्रासह गोव्यातील एका बीचवर मौजमजा करताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

संगमनेर (अहमदनगर) : स्वतःच्या घरात दागिन्यांसह सव्वातीन लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारून, ते नाशिकमध्ये विकणाऱ्याला त्याच्या मित्रासह गोव्यातील एका बीचवर मौजमजा करताना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

मालदाड रस्त्यावरील विद्युत वसाहतीत राहणाऱ्या संजय डमरे यांच्या घरातून 20 ऑक्‍टोबरला मुलगा आतिष याने मित्र सूरज वाघ व त्याच्या पत्नीच्या मदतीने दोन लाख 82 हजार 500 रुपयांचे 10 तोळे सोन्याचे दागिने व 25 हजाराची दुचाकी, पॉवर बॅंक, तीन घड्याळे, असा तीन लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. हा ऐवज नाशिकमध्ये विकल्याचे आतिषच्या आईने पोलिसांना सांगितले. 

पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी यांनी मोबाईल लोकेशनवरून माग काढीत थेट गोवा गाठला. दोन दिवस तपास करून, अखेर तेथील कलंगुट बीचवर मौजमजा करणारा आतिष व सूरज वाघ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या नऊ दिवसांत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief was caught on a beach in Goa with a friend