esakal | लक्ष्मी पुजली पण ती चोरांनाच प्रसन्न झाली
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves broke into the house on the day of Lakshmi Puja

लक्ष्मीपूजनानंतर सर्व जण झोपण्यासाठी गेले. आज पहाटे नागरे यांची सून प्रतीभा पाणी पिण्यासाठी उठली असता, त्यांना देवघरातून आवाज आला.

लक्ष्मी पुजली पण ती चोरांनाच प्रसन्न झाली

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर : वडुले खुर्द येथे लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा 1 लाख 78 हजार, तर ढोरजळगाव येथून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 2 लाख 20 हजार रुपये, अशा एकूण 3 लाख 98 हजारांचा ऐवज चोरांनी आज पहाटे लंपास केला. चोरांच्या मारहाणीत वडुले खुर्द येथील भुजंग पांडुरंग नागरे हे जखमी झाले. 

याबाबत पांडुरंग नागरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, वडुले खुर्द येथे नागरे कुटुंबीय राहतात. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी काल (शनिवारी) सायंकाळी त्यांनी घरातील दागिने व रोख रक्कम, असा एकूण 1 लाख 78 हजारांचा ऐवज ठेवला होता.

लक्ष्मीपूजनानंतर सर्व जण झोपण्यासाठी गेले. आज पहाटे नागरे यांची सून प्रतीभा पाणी पिण्यासाठी उठली असता, त्यांना देवघरातून आवाज आला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता, दोन चोर दिसले. तिने पती भुजंग यांना झोपेतून उठवून आरडाओरडा केला. त्या आवाजाने घरातील सगळे जागे झाले. त्यामुळे चोरांनी पळ काढला असता, त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी चोरांनी केलेल्या दगडफेकीत दोघे जखमी झाले. 

घराचा समोरचा दरवाजा कटावणीने तोडून चोरांनी आत प्रवेश केला. एक तोळ्याचा सोन्याचे नेकलेस, सात ग्रॅमची सोन्याची गुरूमाळ, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र व रोख 90 हजार रुपये, असा 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. 

सराफ दुकान फोडले 
ढोरजळगाव येथे दुसऱ्या घटना घडली. चोरांनी गणेश शिवाजी दहिगावकर यांचे ढोरजळगाव येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. चोरांनी दुकानाचे शटर उचकाटून काल (शनिवारी) रात्री सोने-चांदी व रोख रक्कम, असा 2 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी लक्षात आला. दोन्ही घटनांत एकूण 3 लाख 98 हजारांचा ऐवज चोरांनी लंपास केला. याबाबत पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. 

संपादन - अशोक निंबाळकर