घोडेगावात १ डिसेंबरला चुल व गाव बंद

सुनील गर्जे
Sunday, 29 November 2020

घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात दहा दिवसानंतरही पोलिसांना यश न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री मंदिरात बैठक घेऊन नाराजी व्यक्त करत मंगळवारी १ डिसेंबरला चुल व गावबंद ठेवून घोडेगाव चौफुला येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिरात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात दहा दिवसानंतरही पोलिसांना यश न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री मंदिरात बैठक घेऊन नाराजी व्यक्त करत मंगळवारी १ डिसेंबरला चुल व गावबंद ठेवून घोडेगाव चौफुला येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिरातील गाभार्यातील गुरुवारी (ता. १९) रात्री अज्ञात चोरट्यांनी १० लाख ३७ हजार रुपये किमतीच्या सतरा किलो चांदी चोरली. दरम्यान चोरीची घटना होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरीही पोलिसांना चोरट्यांचा तपास लागत नाही तसेच या काळात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने नाराजी व्यक्त करत या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. २८) रात्री ग्रामस्थांची मंदिरात बैठक झाली.

बैठकीत मंगळवार (ता. १)  डिसेंबर नगर- औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव चौफुला येथे होणाऱ्या रास्तारोको आंदोलनप्रसंगी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी स्वतः भेट देऊन चोरी तापासाबाबत लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल. अन्यथा चुलबंद, गावबंदसह रास्तारोको आंदोलने सुरूच ठेवणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

दरम्यान ग्रामस्थांच्या बैठकीची माहिती समजताच सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी बैठकीत ग्रामस्थांशी चर्चा करून तपासाची पूर्ण माहिती देत आंदोलनाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहत त्यांनी कर्पे यांना आंदोलाबाबत निवेदन दिले.

ट्रस्ट देखील दोषी; ग्रामस्थांच्या भावना
दरम्यान मंदिरासाठी लाखोंच्या देणग्या गोळा होऊन देखील मंदिरातील सीसीटीव्हीटी यंत्रणा बंद असल्यामुळे या चोरीच्या तपासात  अडचणी निर्माण होत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असती तर पोलिसांना तपासात मोठी मदत झाली असती. आणि तपास जलद गतीने लागला असता. त्यामुळे या चोरीच्या तपासला होत असलेला  ट्रस्ट देखील ठेवढीच दोषी असल्याची भावना अनेक  ग्रामस्थांची व्यक्त केली. 

घोडेश्वरी मंदिर चोरी तपासासाठी  पोलिसांचे  पथके नियुक्त केलेले आहेत.  अनेक मार्गांनी तपास सुरू आहे.  ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा. लवकरात लवकर चोरट्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
- रामचंद्र कर्पे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सोनई 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thieves in the Ghodeshwari Devi temple theft case were not investigated