विद्यार्थ्यांनी टाकला सुटकेचा नि:श्‍वास; तिसऱ्या दिवशी परीक्षा सुरळीत

विलास कुलकर्णी
Thursday, 15 October 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेच्या काल म्हणजे तिसऱ्या दिवशी गोंधळ मिटला. वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका पोहोचल्या. परीक्षा सुरळीत पार पडली. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राहुरी (अहमदनगर) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेच्या काल म्हणजे तिसऱ्या दिवशी गोंधळ मिटला. वेळापत्रकानुसार प्रश्नपत्रिका पोहोचल्या. परीक्षा सुरळीत पार पडली. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पहिले दोन दिवस काही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पोहोचल्या नाहीत. त्यामुळे, विद्यार्थी दिवसभर महाविद्यालयात उपाशीपोटी बसून, परीक्षा न देता माघारी गेले. काही अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका दोन ते चार तास उशिरा महाविद्यालयांना पोहोचल्या. त्यातही गोंधळ झाला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या. त्यामुळे, घाबरलेल्या काही विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रश्नपत्रिका सोडवली नाही. दुसऱ्या दिवशी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका नाईलाजाने सोडविली. त्यामुळे, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला.

तिसऱ्या दिवशी सर्व अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रकानुसार पोहोचल्या. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील प्रश्नपत्रिका मिळाल्या. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे दडपण दूर झाले. परंतु, पहिले दोन दिवस उडालेल्या गोंधळामुळे काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. तर, काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका सोडविल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

बदनामीचे षड्यंत्र?
राज्य सरकारने कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने सर्व विद्यापीठांना परीक्षा घेण्यास सांगितले. अगोदर 'सराव परीक्षा' प्रक्रिया झाली. त्यातील त्रुटी दूर करून, परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी विद्यापीठे सज्ज झाली. परंतु, पुणे विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा दोन दिवस कोलमडली. यामागे राज्य सरकारच्या बदनामीचे षडयंत्र आहे काय? असा प्रश्‍न शिक्षणतज्ञ व्यक्त करू लागले आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the third day the examinations of Pune University went smoothly