
उरावर धोंडा ठेवून चरितार्थासाठी पुन्हा शहराची वाट धरली. आई वडिलांच्या प्रेमाची गरज असलेल्या वयात, आजी आजोबांकडे राहणारी, आई-वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून त्यांची वाट पाहणारी बालके अनेकांना अस्वस्थ करतात.
संगमनेर ः सुमारे सात महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. देशातील सुमारे एक लाख नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना महामारीने, माणूसकीसह मानवी नात्यांमध्येही दुरावा निर्माण केला आहे.
एकविसाव्या शतकात वैद्यकीय क्षेत्राने मोठी भरारी मारली असतानाही कोरोना या विषाणूजन्य महामारीचा प्रादुर्भाव जगाला खऱ्या अर्थाने ताप देत आहे. जागतीक पातळीवरील प्रादुर्भावात मागे असलेला आपला देश व राज्य झपाट्याने बाधितांच्या यादीत वरच्या स्थानी आले.
कोणतीही निश्चित लस किंवा उपाययोजना नसल्याने, अद्यापही जग या महामारीची झुंजते आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पूर्वकल्पना असल्याने, मोठी काळजी घेवूनही कोरोनाचा प्रसार वेगाने झाला.
कार्पोरेटसह सर्व क्षेत्रात याचा प्रभाव दिसू लागल्याने उद्योग व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला. यातून अद्यापही उद्योगविश्व पुरेशा प्रमाणात सावरले नाही. लाखो जणांना नोकऱ्या गेल्याने रोजीरोटीला मुकावे लागले.
कामधंदा नसल्याने चाकरमान्यांनी आपल्या मुळ गावाकडे परतीची वाट धरली. त्यांच्याबरोबर राज्याच्या खेडोपाडी कोरोना पोचला. मुळ गावी आहे, त्या जमापुंजीत कसेतरी चार-पाच महिने अस्वस्थतेने काढल्यानंतर सुरू झालेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत चाकरमाने पुन्हा शहराकडे परतू लागले. मात्र, तुलनेत कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नसलेल्या खेडेगावात त्यांनी कच्च्या-बच्च्यांना ठेवले.
उरावर धोंडा ठेवून चरितार्थासाठी पुन्हा शहराची वाट धरली. आई वडिलांच्या प्रेमाची गरज असलेल्या वयात, आजी आजोबांकडे राहणारी, आई-वडिलांच्या वाटेकडे डोळे लावून त्यांची वाट पाहणारी बालके अनेकांना अस्वस्थ करतात.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सचिन व सोनाली नागरे या दांपत्यांनीही त्यांच्या चार वर्षाची चिऊ व दोन वर्षाचा बाबू यांना मूळ गावी ठेवून, पोटाची खळगी भरण्यासाठी पुन्हा मुंबई गाठली. आई-वडिलांची वाट बघत ही निरागस चिमुकली घराच्या अंगणात खेळत आहेत.
संपादन - अशोक निंबाळकर