शेततळ्याच्या अस्तरीकरणाला लागणाऱ्या कागदासाठी घरात पैसे ठेवले होते पण...

सचिन सातपुते
Monday, 17 August 2020

घराच्या दरवाजाचे कडीकोंडा तोटून चोरटयांनी शेततळयाच्या अस्तरीकरणासाठी लागणाऱ्या प्लँस्टीकसाठी आणून ठेवलेले दोन लाख 70 हजार रुपये व एक लाख 11 हजाराचे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख 81 हजाराचा मद्देमाल चोरटयांनी लंपास केला.

शेवगाव (अहमदनगर) : घराच्या दरवाजाचे कडीकोंडा तोटून चोरटयांनी शेततळयाच्या अस्तरीकरणासाठी लागणाऱ्या प्लँस्टीकसाठी आणून ठेवलेले दोन लाख 70 हजार रुपये व एक लाख 11 हजाराचे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख 81 हजाराचा मद्देमाल चोरटयांनी लंपास केला.

इतर ठिकाणी नागरीकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. हा चोरीचा प्रकार नजिक बाभुळगाव (ता. शेवगाव) येथील माळेगाव रस्त्यावरील घाडगे वस्तीवर रविवार (ता. 16) पहाटे 2 ते 4 वाजताच्या दरम्यान घडला. याबाबत जगन्नाथ भानुदास घनवट (वय 57, रा. नजीक बाभुळगाव, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन चोरटयांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, माळेगाव रस्त्यावरील घाडगे वस्तीवरील शेतामध्ये मी पत्नी चंद्रकला, मुलगा अर्जुन, सुन सुवर्णा, मुलगी आशाबाई राहतो. मोठा मुलगा प्रा. शरद हा त्याच्या कुटूंबासह शेवगावला राहतो. शनिवारी रात्री कुटूंबातील सर्वजण जेवण करुन घराचे सर्व दरवाजे व्यवस्थित बंद करुन झोपलो होतो.

रविवार पहाटे 4 च्या दरम्यान जनावरांना चारा टाकण्यासाठी उठल्यानंतर घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडल्याचे लक्षात आले. घरातील सर्व रुमची पाहणी केली असता लोखडी पेटी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामध्ये मुलगा शरदने शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी लागणा-या प्लँस्टीकसाठी दिलेले दोन लाख 70 हजार रुपये व एक तोळ्याची सोन्याची चैन, एक तोळ्याची व पाच ग्रँमची दोन पिळ्याच्या अंगठया, दहा ग्रँमचे झुंबर, एक तोळयाचा सर, दीड तोळयाचे मणीमंगळसुत्र असे एक लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेला.

परिसराची पाहणी केली असता कपाशीच्या क्षेत्रामध्ये लोखंडी पत्र्याची पेटी पडलेली आढळून आली. त्यातील कपडे व कागदपत्रांची उचकापाचक करुन रोख रक्कम व दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहीती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, उपनिरीक्षक सुजीत ठाकरे यांनी समक्ष पाहणी केली. तर दुपारी गुन्हे अन्वेषण विभाग, ठसे तज्ञ व श्वान पथक आदी घटनास्थळी दाखल होवून घराची व परीसराची पाहणी केली. श्वान पथकाने घरापासून जवळ असलेल्या गणपती मंदीरापर्यंत माग दाखविला. घनवट यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरुध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार नजिकबाभुळगाव परीसरातील गर्जे वस्ती, खाडे वस्ती इतर एक दोन ठिकाणी चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला. संजय खाडे यांचा मोबाईल व श्रीकांत घनवट यांची बँटरी मात्र चोरटयांनी लंपास केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh stolen in Malegaon in Shevgaon taluka