esakal | नागपंचमीनिमित्त दुचाकीवर सासुरवाडीला निघाले... जोरदार पाऊस झाला अन्‌...
sakal

बोलून बातमी शोधा

The three missing persons were found in a river flood at Gevrai

गेवराई (बीड) तालुक्‍यातील पौळाची वाडी येथील अमृता नदीच्या पुरात गुरुवारी (ता. २३) रात्री बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील दोन मुले व वडील बेपत्ता झाले.

नागपंचमीनिमित्त दुचाकीवर सासुरवाडीला निघाले... जोरदार पाऊस झाला अन्‌...

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

शेवगाव : गेवराई (बीड) तालुक्‍यातील पौळाची वाडी येथील अमृता नदीच्या पुरात गुरुवारी (ता. २३) रात्री बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील दोन मुले व वडील बेपत्ता झाले. कृष्णा बाळासाहेब घोरपडे (वय 35), मुलगा प्रथमेश (वय 8) व मुलगी वैष्णवी (वय 5) अशी त्यांची नावे आहेत. त्यातील वैष्णवीचा मृतदेह सापडला आहे. बाप- लेकाचा शोध आज उशिरापर्यंत सुरू होता. 

बालमटाकळी येथून गुरुवारी रात्री नागपंचमीनिमित्त सासुरवाडीला पौळाची वाडी (ता. गेवराई) येथे दोन्ही मुलांसह दुचाकीवर कृष्णा घोरपडे निघाले होते. परिसरात रात्री नऊच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. तशी माहिती कृष्णा यांनी पत्नीला फोन करून दिली. जोरदार पावसामुळे चकलांबा- गेवराई रस्त्यावरील पौळाची वाडी भागातील अमृता नदीला पूर आला होता. रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना घोरपडे यांनी पाण्यात दुचाकी घातली. मात्र, रस्त्याचा अंदाज चुकल्याने, दुचाकीसह तिघेही नदीत पडून बेपत्ता झाले. 

रात्री पाऊस आणि अंधारामुळे ही घटना कोणालाच समजली नाही. काही वेळाने परिसरातील तिघे युवकही दुचाकीसह नदीत पडले. दुचाकी वाहून गेली. मात्र, पोहता येत असल्याने तिघे काठावर आले. आज सकाळी वाहून गेलेली दुचाकी शोधण्यासाठी ते नदीत उतरले तेव्हा त्यांना दुसरीच दुचाकी सापडली. त्यामुळे नदीत अजून कोणीतरी वाहून गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, रात्रीपासून गायब असलेल्या घोरपडे कुटुंबातील तिघांच्या शोधात बालमटाकळी येथून त्यांची पत्नी व पौळाची वाडी येथून नातेवाईक आले होते. त्यांनी कृष्णा घोरपडे यांची दुचाकी ओळखली. त्यानंतर हे तिघेही पाण्यात वाहून गेल्याचे लक्षात आले. 

याबाबत माहिती मिळताच, गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर घटनास्थळी आले. नायब तहसीलदार अभय जोशी, बालमटाकळी व पौळाची वाडी येथील ग्रामस्थ, नातेवाईक व अग्निशमन पथकाने शोध सुरू केला. त्या वेळी एका झुडपात अडकलेली वैष्णवी मृतावस्थेत आढळून आली. कृष्णा व त्यांचा मुलगा प्रथमेश यांचा शोध आज उशिरापर्यंत सुरू होता.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image