
शहरालगतच्या ढोलेवाडी, इंदिरानगर व तालुक्यातील हिवरगाव पठार येथील शेंडगेवाडी येथील युवकांचा समावेश आहे.
संगमनेर ः शहर व तालुक्यातील तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. शहरालगतच्या ढोलेवाडी, इंदिरानगर व तालुक्यातील हिवरगाव पठार येथील शेंडगेवाडी येथील युवकांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ः ढोलेवाडी येथील वैभव दत्तात्रेय पाबळे (वय 22) याने रविवारी (ता. 13) रात्री साडेआठपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीमुळे, त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - व्हिडिओ क्लिपद्वारे लैंगिक अत्याचार
दुसऱ्या घटनेत शहरातील इंदिरानगर भागातील गोपाल लालबहादूर थापा (वय 19, मूळ रा. नाशिक) या युवकाने रविवारी मध्यरात्री घराच्या छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोन्ही घटनांबाबत शहर पोलिस ठाण्यात "अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत तालुक्यातील हिवरगाव पठारच्या शेंडगेवाडी येथील रमेश नामदेव काळे (वय 26) याने कर्जुले पठारच्या डोंगरावर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात "अकस्मात मृत्यू'ची नोंद झाली आहे.