तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महालादरम्यान रस्त्याचे काम सुरू

अमित आवारी
Saturday, 31 October 2020

सावेडी उपनगरातील महत्त्वाच्या व बहुचर्चित तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे.

अहमदनगर : सावेडी उपनगरातील महत्त्वाच्या व बहुचर्चित तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. सावेडी उपनगरासाठी नवीन बाजारपेठेला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता ठरणार आहे. 

सावेडी उपनगरातील वाढती लोकसंख्या पाहता, प्रशस्त रस्त्याची गरज भासत होती. पाइपलाइन रस्ता व गुलमोहर रस्त्याला जोडणारा मध्यवर्ती भिस्तबाग रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व्हावे, ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्यानुसार महापालिकेने तीन कोटींचा निधी उपलब्ध केल्याने रस्त्याचे काम सुरू झाले आहे. 

हे काम मार्चमध्येच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन, रस्त्यावरील अतिक्रमणे, रस्त्यातील अडथळे ठरणारे वृक्ष काढणे व भुयारी गटाराच्या स्थलांतराच्या कामामुळे कामास विलंब झाला. हा रस्ता तीन टप्प्यांत होणार आहे. त्यात तोफखाना पोलिस ठाणे ते गुलमोहर रस्ता कोपरा, गुलमोहर रस्ता कोपरा ते भिस्तबाग चौक व भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल, असे हे टप्पे असतील. त्यातील पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी अतिक्रमणे, वृक्ष काढले आहेत. त्या बदल्यात रस्ता झाल्यावर दुतर्फा वृक्षलागवड केली जाणार आहे. 

रस्तारुंदीकरण केलेल्या भागात मुरूम, खडीकरण करून डांबरीकरणाचे दोन थर टाकण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जास्त जमा होते, तेथे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. रस्त्याच्या कडेला सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नवीन जलवाहिन्याही रस्त्याच्या कडेला राहतील. हा रस्ता झाल्यास सावेडी उपनगराच्या उत्तरेकडील तपोवन व शहराच्या उत्तरेकडील भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी चांगली सोय होणार आहे. प्रोफेसर कॉलनी व भिस्तबाग चौक परिसरात सध्या बाजारपेठ तयार होत आहे. या रस्त्यामुळे ही बाजारपेठ वाढीला लागण्यास मदत होईल. 

* रस्त्याची लांबी - 2.70 किलोमीटर 
* तोफखाना पोलिस ठाणे ते गुलमोहर रस्ता कोपऱ्यादरम्यान रुंदी - 20 मीटर 
* कुष्ठधाम ते भिस्तबाग चौकादरम्यान रुंदी - 18 मीटर 
* भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महालादरम्यान रुंदी - 15 मीटर 
* सुमारे तीन कोटींचा खर्च अपेक्षित; निधी मंजूर 
* उपनगराची बाजारपेठ विकसित होण्यास हातभार
 

महापालिकेचे व्याजातून रस्ते 
महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून विविध विकासकामांसाठी निधी येतो. हा निधी महापालिकेने बॅंकेत ठेवला. त्याच्या व्याजातून महापालिकेने शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना सुरवात केली. त्यात तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल, तारकपूर ते रामवाडीतील पेट्रोलपंप, सर्जेपुऱ्यातील हत्ती चौक ते फलटण पोलिस चौकी यांचा त्यात समावेश असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tofkhana Police progress work on the road from Thane to Bhistbagh Mahal