मुसळधार पावसाने डिग्रसमधील पुल गेला वाहून

आनंद गायकवाड
Saturday, 26 September 2020

डिग्रस गाव ते आदिवासी समाजाच्या जाधव वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील मोरी पुल नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील डिग्रस गाव ते आदिवासी समाजाच्या जाधव वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील मोरी पुल नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. पंचायत समितीच्या सेस फंडा अंतर्गत सुमारे पाच लाख ३२ हजार ४०० रुपये खर्चाच्या रस्त्यावरील मोरी पुलाच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारणाची चौकशी कऱण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पंचायत समिती सेस निधी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संगमनेर तालुक्‍यातील डिग्रस ते जाधव वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यावरील मोरी पूल निकृष्ट कामामुळे पावसाच्या पाण्याने तब्बल दोन वेळा वाहून गेला आहे. याबाबत ग्रामसेवक किशोर मांढरे यांनी सविस्तर अहवाल पंचायत समिती कार्यालयात पाठविला आहे. मात्र या दुरवस्थेची पहाणी करण्यासाठी अद्याप जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य फिरकलेही नसल्याने, हे लोकप्रतिनीधी नामधारी आहेत का असा सवाल भाजपचे अंभोरे गणप्रमुख नवनाथ वावरे यांनी केला आहे. 

डिग्रस गावातील ग्रामस्थांसह जाधव वस्तीच्या आदिवासी बांधवांटी या मार्गाने नेहमी वर्दळ असते. मोरीवरील रस्ता वाहून गेल्याने केवळ पाऊलवाट शिल्ल्क असून, तीही धोकादायक अवस्थेत असल्याने त्यावरुन प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. पुढील अनर्थ घडण्याआगोदर या दुरवस्थेची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सेस फंडातून 2017-2018 साली झालेल्या या कामासाठी पाच लाख बत्तीस हजार चारशे रुपये निधी उपलब्ध होता. सुरवातीपासूनच या बांधकामाच्या दर्जाविषयी शंका व्यक्त केली जात होती. शेवटी ग्रामस्थांची शंका खरी असल्याचे सिध्द झाले. या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपचे अंभोरे गणप्रमुख नवनाथ वावरे, राष्ट्रीय समाज पक्ष युवक संगमनेर तालुकाध्यक्ष सोपान तांबडे, संगमनेर रयत क्रांती संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष एकनाथ बिडगर यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नवनाथ वावरे यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The torrential rains swept away the bridge in Digras