esakal | फुलांना आला सोन्याचा भाव, विक्रेत्यांची झाली चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

In the town the flowers sold for gold

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सोशल डिस्टन्सचे नियम घालून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने यंदा नवरात्रोत्सव, दसरा व ईद नागरिकांनी घरीच साजरी करावी.

फुलांना आला सोन्याचा भाव, विक्रेत्यांची झाली चांदी

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुलांना आज विशेष मागणी होती. सकाळी झेंडूने 300 प्रति किलोचा दरही गाठला होता. तर आपट्याच्या पानांची गड्डी 20 रुपयांनी विकली गेली. शनिवारी सायंकाळी 200 ते 250 रुपये दराने विकली जात होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात चारपटीने वाढ झाली. 

दसरा व दिवाळी डोळ्या समोर ठेवून नगर व पारनेर तालुक्‍यांतील शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. मात्र या वर्षी अतिवृष्टीमुळे फूल शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतून वाचलेल्या फुलांनी आज चांगलाच भाव खाल्ला. झेंडू 300 रुपये, शेवंती 300 ते 350, ऍस्टर 350 रुपये प्रति किलो दराने विकले गेले. 

लॉकडाउननंतर थंडावलेला सुवर्ण खरेदी व वाहन खरेदी व्यवसायाला दसऱ्याच्या मुहूर्तावर पुन्हा चालना मिळू लागली आहे. यंदा चांगला पाऊस झाला तसेच नागरिकांची कोरोना विषयक भीती कमी झाल्याने सुवर्ण खरेदी व वाहन खरेदीसाठी ग्राहक आज बाहेर पडले. या व्यवसायांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40 टक्‍के कमी ग्राहक होते. दिवाळीत ग्राहक मोठ्या संख्येत खरेदीसाठी बाहेर पडतील असा अंदाज व्यापारीवर्ग व्यक्‍त करत आहे. 

शेतकऱ्यांना 70 रुपये 
ग्राहकांना 300 रुपये 

अतिवृष्टीचे कारण देत व्यापाऱ्यांनी फुले खराब होतात असे सांगत शेतकऱ्यांकडून 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने झेंडूची फुले खरेदी केली. मात्र आज हीच फुले व्यापाऱ्यांनी 300 रुपये प्रति किलोने ग्राहकांना विकली. 

रावणदहन, सिमोल्लंघन 
परंपरेचे उल्लंघन 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सोशल डिस्टन्सचे नियम घालून दिले आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने यंदा नवरात्रोत्सव, दसरा व ईद नागरिकांनी घरीच साजरी करावी. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणताही कार्यक्रम करण्यास मनाई केली होती. त्यामुळे आज रावणदहन व सिमोल्लंघनासाठी नागरिक घराबाहेर पडले नाहीत. नागरिकांनी आपट्याच्या पानांचे घरीच पूजन करत जेष्ठांना आपट्याची पाने दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही संचलन व शस्त्रपूजनाचे कार्यक्रम आज घेतले नाहीत. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image