हनुमानवाडीवर विषप्रयोग, गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरीत कालवले विष

गौरव साळुंके
Saturday, 7 November 2020

भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरातील बिरदवडेवस्ती, अभंगवस्ती, कांबळेवस्ती, जाधववस्ती, भोईटेवस्ती, विधाटेवस्ती, पटारेवस्त्यांसाठी पिण्याचे पाणी सदर विहिरीतून पुरवठा केला जातो. काल काही शेतकरी सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीसमोर काम करीत असताना त्यांना विहिरीच्या इंजिनसमोर काही बाटल्यासह इतर साहित्य आढळून आले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील भोकर येथील हनुमानवाडी परिसरातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत अज्ञात समाजकंटकांनी विषारी पदार्थ टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सदर विहिरीतील पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर विहिरीजवळील एका शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
 
भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरातील बिरदवडेवस्ती, अभंगवस्ती, कांबळेवस्ती, जाधववस्ती, भोईटेवस्ती, विधाटेवस्ती, पटारेवस्त्यांसाठी पिण्याचे पाणी सदर विहिरीतून पुरवठा केला जातो. काल काही शेतकरी सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीसमोर काम करीत असताना त्यांना विहिरीच्या इंजिनसमोर काही बाटल्यासह इतर साहित्य आढळून आले.

संबंधित शेतकरी विहिरीत डोकावला असता, त्यांना विहिरीच्या पाण्यावर शेकडो मासे मृतावस्थेत दिसले. तसेच पाण्यावर विशिष्ट प्रकारच्या द्रवाचा तवंग आल्याचा दिसुन आला. त्या शेतकऱ्याने तात्काळ उपसरपंच राधाकिसन विधाटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोग्य सेवक प्रदीप गवई यांच्या मदतीने पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला.

प्राथमिक तपासणीत पाण्यात विषारी द्रव मिळाल्याचा निष्कर्ष निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने सदर विहिरीचा पाणी पुरवठा थांबविला. तसेच ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी विहिरीतील पाणी उपसा करून विहिरीच्या स्वच्छतेच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

संपादन : सुस्मिता वडतिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toxic substances have been dumped in public water supply wells in Hanumanwadi area