esakal | श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यास पत्नीसह जळगाव जिल्ह्यातून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

A trader who cheated farmers in Shrirampur has been arrested along with his wife from Jalgaon district

रविवारी आरोपींना येथील तालुका पोलिस ठाण्यात आणले. असून आणखी दोन आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांकडुन त्याचा शोध सुरु आहे.

श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यास पत्नीसह जळगाव जिल्ह्यातून अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करुन माळवाडगाव येथून कुटूंबासह पसार झालेल्या व्यापाऱ्याला पत्नीसह पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून अटक केली. येथील पोलिसांनी छापेमारी टाकून गणेश रमणलाल मुथ्था (वय ५०) व त्याची पत्नी आशाबाई गणेश मुथ्था (वय ४५) यांना गणपूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथून शनिवारी मध्यरात्री अटक केली. रविवारी आरोपींना येथील तालुका पोलिस ठाण्यात आणले. असून आणखी दोन आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांकडुन त्याचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी गणेश मुथ्था याच्याकडून एक चारचाकी, एक दुचाकी, ५० हजार रुपये, काही मोबाईल व धनादेश पुस्तक (चेकबुक) जप्त केले. आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात रविवारी दुपारी हजर केले. असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना शनिवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

पोलिसांनी यापुर्वी मुंबई, पालघर, बडोदा, नवसारी (गुजरात), जळगाव, औरंगाबाद येथे छापेमारी टाकुन आरोपींच्या शोध घेतला. परंतू पसार व्यापारी कुटूंब पोलिसांना सापडत नव्हते. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी मध्यरात्री गणेश मुथ्था याला पत्नीसमवेत जळगाव जिल्ह्यातील गणपूर (ता. चोपडा) येथून पकडले. अधिक चौकशीसाठी त्यांना पुढील सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

व्यापारी मुथ्था कुटूंबाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येताच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस प्रशासनाने तपासाची चक्र फिरवून पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने मोठ्या शिताफितीने ही कारवाई केली.

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, भामाठाण व खानापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, हरभरा, मका (भुसारमाल) खरेदी करुन धनादेश व पावत्या देवून पैसे देण्यापूर्वी व्यापारी रमेश मुथ्था कुटुंबासह रातोरात पसार झाला होता. सदर घटनेला दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत होते. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी रमेश मुथ्था, गणेश मुथ्था, चंदन मुथ्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

loading image