महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिलांना प्रशिक्षण : नितीन गडकरी

आनंद गायकवाड
Monday, 9 November 2020

महिला उद्योजकांसाठी सरकारच्या विविध योजना असून, महिलांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. देशाचा विकास उद्योगावरच अवलंबून असतो.

संगमनेर (अहमदनगर) : महिला उद्योजकांसाठी सरकारच्या विविध योजना असून, महिलांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. देशाचा विकास उद्योगावरच अवलंबून असतो. दृष्टीकोन बदलण्यासाठी तज्ज्ञ, अनुभवी व यशस्वी लोकांचे मार्गदर्शन घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

स्त्री उद्यमी फाउंडेशन, स्वयंशक्तीतर्फे आयोजित ऑनलाइन ज्ञानमालिका व्याख्यान मालिकेत मंत्री गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ""स्थानिक लोकांची कला हेरून तेथील कच्च्या मालाची उपलब्धता, हवामान, गुणवत्ता बघून व्यवसाय सुरू करा.

गुणवत्तेबाबतीत कधीही तडजोड करू नका. गुणवत्ता, चांगले पॅकेजिंग व मार्केटिंग यशस्वी व्यवसायाची गुरूकिल्ली आहे. महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ग्रामीण, कृषी क्षेत्रात खादी उद्योग, अगरबत्ती उद्योग, सोलर चरखा अशा नवनवीन कल्पना आणत असून, त्याबाबत स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत 80 लाख महिला जोडल्या गेल्या असून, दोन कोटी महिला उद्यमींना जोडण्याचा संकल्प आहे.'' 

गडकरी म्हणाले, ""महिलांकडे कला आहे; पण त्यांना एक्‍सपोजर मिळत नाही. सरकारी योजनांचा फायदा घ्या. स्वतःसह देशाच्या विकासाला हातभार लावा. सरकार महिलांना अनुदान देण्यास नेहमीच तयार आहे. या योजनेंतर्गत काहीही तारण ठेवावे लागत नाही. जवळजवळ पाच हजार कोटी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. आयात टाळण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. लघुउद्योगात काम करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी आवश्‍यकतेप्रमाणे मदत करू.'' 

"स्वयंशक्ती'च्या अध्यक्ष दीपाली चांडक म्हणाल्या, की महिला उद्योजिकांपुढे अनेक अडचणी असतात. "स्वयंशक्ती' अशा महिलांना मार्गदर्शन करते. ग्रामीण व शहरी भागात 50पेक्षा अधिक क्षेत्रात व दोन हजारांपेक्षा अधिक महिला "स्वयंशक्ती'शी जोडल्या आहेत. सरकारी संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. त्याद्वारे कौशल्यवान महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व नेटवर्किंग उपलब्ध करून देत आहोत. 

उपाध्यक्ष स्वाती शाह, शीतल देसाई, क्रांती शाह, रुपाली पडगीलवार, आश्‍लेषा पिंपळेकर, राधिका पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचा सुमारे दीड हजारांहून अधिक स्त्री उद्यमींनी लाभ घेतला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Training women inspired by Mahatma Gandhi thought Nitin Gadkari