
ग्रामसभा घेऊन धर्मांतर किंवा अंधःश्रध्दा गावात होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
अकोले : तालुक्यात नाशिकच्या हद्दीलगत आदिवासी बहुल गावं आहेत. तेथील आदिवासींना आमिषे दाखवून धर्मांतर घडवून आणले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील काही धर्मगुरू येथे येत आहेत, असा आदिवासी विकास परिषदेचा आरोप आहे. तेथे चर्च उभारण्यासाठी आदिवासींची जमीन बक्षीसपत्र करून घेतली होती. वास्तविक तसे करता येत नाही.
तिरढे (ता. अकोले) येथील कचरू सखाराम सारुकते यांच्या जमिनीवर चर्चचे भूमिपूजन फादर व त्यांच्या अनुयायांनी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिवासींच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परंतु, आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला.
त्यानंतर ग्रामसभा घेऊन धर्मांतर किंवा अंधःश्रध्दा गावात होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत अकोले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
नाताळनिमित्त तिरढे येथे संबंधित फादर व इतर लोक आले होते. त्यांनी तेथे चर्चच्या भूमिपूजनाचा प्रयत्न केला. या वेळी तिरढे, पाडोशी, एकदरे, देवगाव, भंडारदरा येथील ग्रामस्थ उपस्थित होते. धर्मांतर होणार असल्याचे कळताच आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेऊन हा प्रकार हाणून पाडला.
सरपंच संगीता गोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी हा धर्मांतराचा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असून, सरकारी कर्मचारी यात सहभागी आहेत, असा आरोप केला.
यावेळी आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव, आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश भांगरे, सरपंच परिषदेचे राज्य सचिव पांडुरंग खाडे, बाळू भांगरे, काळू भांगरे, चित्रा जाधव, दिनेश शहा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.