
येथील मंगलमय वातावरणात अशा भाविकांमुळे इतरांना संकोचल्यासारखे होते. अशा तक्रारी सामान्य भाविकांनीच संस्थानकडे केल्या होत्या.
शिर्डी ः भाविकांनी किमान सभ्य पोषाखात साईदर्शनासाठी यावे, असे विनंतीवजा आवाहन करणारे फलक साईसंस्थानने लावले. मात्र, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची भूमिका घेत, त्यास भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला.
देसाई यांच्या भूमिकेवर शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांनी आज आक्षेप घेतला आहे. त्यामुळे साईसंस्थानच्या फलकांवरून नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
शिर्डीतील वादविवादाला माध्यमातून हमखास प्रसिद्धी मिळते. त्यातून आजवर काहीही निष्पन्न झालेले नसले, तरी वादात सुरवातीला दोन्ही बाजू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. माध्यमांचा रस संपला, की वाद आपोआप थंडावतो. वाद निर्माण करणारे आणि त्याचा प्रतिवाद करणारे त्यात उत्साहाने सहभागी होतात.
खरे तर साईसंस्थानने लावलेले फलक आणि त्याबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केलेले आवाहन, यात वाद निर्माण होण्यासारखे काहीही नव्हते. कारण, संस्थानने तसा कुठलाही आदेश काढलेला नाही. कुठलाही "ड्रेसकोड' निश्चित केलेला नाही. केवळ किमान सभ्यतेचे पालन करणारा पोषाख असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही भाविकांचा पेहराव आक्षेपार्ह असतो.
येथील मंगलमय वातावरणात अशा भाविकांमुळे इतरांना संकोचल्यासारखे होते. अशा तक्रारी सामान्य भाविकांनीच संस्थानकडे केल्या होत्या. त्यास प्रतिसाद देत संस्थानने हे आवाहन केले. अर्थात, त्यास प्रतिसाद न देता, कुणी तोकडे कपडे घालून साईदर्शनासाठी आले, तरी त्यास प्रतिबंध करण्यात येणार नाही. विनंती आणि प्रतिबंध, यातील फरक लक्षात न घेता, नाहक हा वाद पेटला आहे.
साई संस्थानचे 10 वर्षांपूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांच्या काळातही असे फलक लावण्याबाबत चर्चा झाली होती. देवाच्या दारी येताना इतरांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करू नयेत, अशी संस्थानची माफक अपेक्षा आहे. मात्र, आगामी काळात हा वाद रंगण्याची शक्यता आहे.
कारण, येथील वाद जाणून घेण्यात देशभरातील भाविक सुरवातीला का होईना, थोडेसे उत्सुक असतात. अडचण एवढीच आहे की, त्यांच्यासाठी आजवर एकदाही वाद निर्माण झालेला नाही.
शिर्डीत देश-विदेशातून भाविक येतात. येथील मंगलमय वातावरणास कुणाच्या पोषाखामुळे बाधा येऊ नये, एवढीच साईसंस्थानची माफक अपेक्षा आहे. साईसंस्थानच्या भूमिकेस आमचा पाठिंबा आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कुणीही वाद निर्माण करू नये. साईबाबा वाद निर्माण करणाऱ्यांना सद्बुद्धी देवो!
- अनिता जगताप, माजी नगराध्यक्ष, शिर्डी , अहमदनगर