esakal | तुकाई उपसा सिंचन योजनेत आणखी चार अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश
sakal

बोलून बातमी शोधा

The Tukai Upsa Irrigation Scheme, which is a lifeline for 28 villages in Karjat taluka, will now include 4 additional seepage ponds..jpg

या योजनेत मुळ मंजूर असलेल्या २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलावांमध्ये ४ वाढीव पाझर तलावांची मंजुरी देण्यात आली आहे. 

तुकाई उपसा सिंचन योजनेत आणखी चार अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत  (अहमदनगर) : तालुक्यातील २८ गावांसाठी जीवनदायिनी असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेत आता ४ अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश करण्यात येणार आहे. तुकाई उपसा सिंचन योजना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी संजीवनी ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या 'मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाच्या (ता.४) फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. आता या योजनेत मुळ मंजूर असलेल्या २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलावांमध्ये ४ वाढीव पाझर तलावांची मंजुरी देण्यात आली आहे. 

या तलावांमध्ये पाणी सोडून त्यानंतर या पाण्याचा सिंचन आणि पिण्यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या वाढीव ५ कोटी ७९ लाख ८७ हजार खर्चास मान्यता देण्यात आली. एखाद्या योजनेत लोकांचा फायदा होणार असेल तर त्या योजनेला अधिक ताकद देण्याचे काम आमदार रोहित पवार हे करत आले आहेत. येत्या काळात कुकडी व सिनाच्या पाण्यापासून जी गावे वंचित आहेत. त्या गावांसाठी वेगळी योजना कशी राबवता येईल, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

तालुक्यात कार्यान्वित असलेली तुकाई उपसा सिंचन ही योजना कुकडी डावा कालवा किमी १७३ येथून प्रस्तावित आहे. तुकाई उपसा सिंचन योजनेंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील एकूण २० पाझर तलाव व ३ ल.घू.पाटबंधारे योजनांमध्ये पाणी सोडण्याचे व तलाव भरून देण्याचे व त्यानंतर या पाणी साठ्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र या सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा विचार करता या योजनेत आणखी वाढीव पाझर तलावांचा सामावेश व्हावा, यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार.रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू होते.

या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण मूळ २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलाव या पाटबंधारे योजनांमध्ये अतिरिक्त वाढीव ४ पाझर तलावांचा सामावेश झाल्याने आता या पाझर तलावांची संख्या २४ झाली आहे. या उपसा सिंचन योजनेंतर्गत तब्बल ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे नियोजित आहे. मूळ मंजुर २० पाझर तलावांसह चार अतिरिक्त वाढीव पाझर तलावांच्या कामासाठी वाढीव खर्चासह ६६.८३ कोटी रकमेची मान्यता देण्यात आली आहे.

मतदार संघात शेतकरी समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावा, त्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले तो त्यांचा हक्क आहे. पिढ्यान पिढ्या पाहिलेले हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे.
- रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड

loading image