रस्तालुटप्रकरण : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना पकडले 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुनतगाव (ता. नेवासे) येथे छापा घालून दोघांना अटक केली.

अहमदनगर : पाथर्डीहून माजलगावकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना लुटल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुनतगाव (ता. नेवासे) येथे छापा घालून दोघांना अटक केली.

शुभम अनिल काळे (वय 21) व आनंद अनिल काळे (वय 25, रा. पुनतगाव, ता. नेवासे, मूळ, रा. गणेशनगर, राहाता) अशी त्यांची नावे आहेत. सागर रमेश कर्डिले (रा. गेवराई, कुकाणा) हा पसार आहे. 

पाथर्डी येथून दुचाकीवर माजलगावकडे जाताना 29 सप्टेंबर रोजी वरील आरोपींनी दुचाकीस्वारांना दमदाटी करून 59 हजारांना लुटले होते. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने पुनतगाव येथे छापा घालून वरील दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी सागर कर्डिले याच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील दुचाकी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested by local crime branch squad in Nagar district