भाजपला जबर हादरा, अकोल्यातील दोन मातब्बर नेते झाले काँग्रेसवासी

शांताराम काळे
Tuesday, 22 December 2020

या नेत्याना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला.

अकोले ः राज्याच्या विविध भागातील भाजपचे बडे नेते पक्ष सोडून चालले आहे. गेल्या काही वर्षात झालेली मेगा भरतीला आता ओहटी लागल्याचे यावरून दिसून येत आहे. एकनाथ खडसेंपाठोपाठात नगर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी परतीचा रस्ता धरला आहे. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व मान्य करीत हे नेते माघारी फिरले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचेही नेते काँग्रेवासी झाले.

अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची भूमिका निभावणारे  २०१६ पासुन काँग्रेस पक्षापासून दूर झालेले ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले अखेर कार्यकर्त्यांसह स्वगृही परतले.

मुंबई येथे गांधी भवनात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्षपद, अगस्ती एज्युकेशनचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले मीनानाथ पांडे, एकवीस वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून तसेच विविध शेतकरी संघटनेत विशेष योगदान असलेले रमेश जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव व आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे मदन पथवे, भास्करराव दराडे, सावरगावचे विद्यमान सरपंच रमेश पवार, एकनाथ सहाने  व ज्येष्ठ नेते पाटीलबुवा सावंत यांनीदेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

महसूलमंत्री‍ बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन  ,प्रदेश काँग्रेसचे महासचिव मोहनदादा जोशी, राजाराम देशमुख , प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रुपवते, नगर जिल्हा उपाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी नेहे, सहसेक्रेटरी अरिफ तांबोळी, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, अॅड के. बी. हांडे शंकरराव वाळूज, पाटीलबुवा सावंत उपस्थित होते.

मधुकरराव नवले यांनी या वेळी श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून नामदार थोरात साहेबांसोबत यापूर्वीही काम केलेले असल्यामुळे  स्वगृही परतण्याचा आनंद झाल्याचे व्यक्त केले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतामध्ये अकोले तालुका पुरोगामी विचारांचा तालुका असून स्वातंत्र्याची चळवळ येथे रुजली वाढलेली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे स्वागत करून  संघटनात्मक ताकद  देणार असल्याचे मत व्यक्त केले. मधुकरराव नवले मीनानाथ पांडे हे राज्यपातळीवरील नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two BJP leaders from Akola joined the Congress party