चुलत भावांनी सकाळी काढलेली सेल्फी ठरला अखेरचा

निलेश दिवटे
Saturday, 8 August 2020

तालुक्यातील रातजन येथे सीना नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्यातील रातजन येथे सीना नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेत तेजस सुनील काळे (वय १५) आणि सिद्धांत विजय काळे (वय १६, दोघे रा. रातजन, ता. कर्जत) अशी मृतांची नावे असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. याबाबत विलास नाना काळे यानी फिर्याद दिली आहे.

पोहायला जाण्यापूर्वी त्यांनी दोघांनी एक सेल्फी फोटो काढला होता. त्यावेळी त्यांना माहिती नव्हते की काही वेळाने काळ आपल्यावर झडप घालणार आहे. यातील सिद्धांत हा दहावी पास होऊन अकरावीत गेला होता. तो एकुलता एक आहे तर तेजस हा दहावीत गेला होता. ते दोघे मिरजगाव येथील नूतन विद्यालयाचे विद्यार्थी होते.

या बाबत वृत्त असे की सीना नदी पात्र वाळू तस्करांनी पूर्ण कोरले असून मोठं मोठे खड्डे सीना पात्रात झाले आहेत. त्यामुळे ते अत्यंत धोकादायक बनले आहे. आज दुपारी सीना नदी प्रवाहित झाल्याने किती पाणी आले हे पाहण्यासाठी तेजस आणि सिद्धांत गेले.

अनेक दिवसानंतर सिनेला पाणी आल्याने त्यांना पोहण्याचा मोह झाला. दोघे सीना पात्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही बाब विलास काळे यांना समजल्यावर त्यांनी नदीकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. मात्र नाका तोंडत पाणी गेल्याने डॉकटरानी त्या दोघांना मृत घोषित केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brothers from Ratjan in Karjat taluka died in Sina river