टॅंकर बिलात फसवणूक; तत्कालीन मुख्याधिकारी, ठेकदार, अभियंता यांचा समावेश असून चौघांविरुद्ध दोषारोपपत्र 

मनोज जोशी
Thursday, 8 October 2020

तत्कालीन मुख्याधिकारी दरेकर, ठेकेदार विलास दशरथ आव्हाड, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी विश्‍वास धुमाळ यांचा त्यात समावेश आहे. 

कोपरगाव (नगर) : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या बिलातून पालिकेची दोन लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्यासह चौघांविरुद्ध दोषारोपपत्र ठेवले आहे. तत्कालीन मुख्याधिकारी दरेकर, ठेकेदार विलास दशरथ आव्हाड, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी विश्‍वास धुमाळ यांचा त्यात समावेश आहे. 

दरम्यान, नगराध्यक्ष विजय वहाडणे व नगरसेवक रवींद्र पाठक यांना मात्र या प्रकरणातून 'क्‍लिन चिट' मिळाली आहे. मात्र, या प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचा आरोप करीत याबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगितले. शहरात ट्रॅक्‍टर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदार आव्हाड यांना प्रति खेप एक हजार रुपये दिले जाणार होते. संजय काळे यांनी जून-2016 मध्ये माहिती अधिकारात माहिती घेतली असता, ठेकेदार आव्हाड यांनी दिलेला वाहनाचा क्रमांक चक्क दुचाकीचा निघाला. 

या प्रकरणात पालिकेची फसवणूक झाल्याची तक्रार काळे यांनी केली होती. प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रारंभिक चौकशी करून, मग गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी दरेकर व अभियंता लोखंडे यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांनी ठेकेदार व कर्मचारी धुमाळ यांच्याकडे रेकॉर्डची जबाबदारी दिल्याचे सांगितले. नगराध्यक्ष वहाडणे यांनी हे बिल आपण नगराध्यक्ष होण्यापूर्वीचे असल्याचे सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two lakh ten thousand rupees were swindled from the bill of the water supply tanker