esakal | लोकवस्तीत पहाटे दोन बिबट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

Two leopards attack a goat at Agrawadi in Rahuri taluka

म्हैसगांव परिसरातील दुर्गम डोंगराळ भागातील आग्रेवाडी येथे रविवारी पहाटे दोन बिबट्यांनी लोकवस्तीत शिरुन, तब्बल तीन तास धुमाकूळ घातला. एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील एक शेळी बिबट्यांनी फस्त केली.

लोकवस्तीत पहाटे दोन बिबट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर: तालुक्याच्या पश्चिमेकडील म्हैसगांव परिसरातील दुर्गम डोंगराळ भागातील आग्रेवाडी येथे रविवारी पहाटे दोन बिबट्यांनी लोकवस्तीत शिरुन, तब्बल तीन तास धुमाकूळ घातला. एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील एक शेळी बिबट्यांनी फस्त केली. त्यामुळे आग्रेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

राजेंद्र रभाजी आग्रे (रा. आग्रेवाडी) यांच्या गोठ्यातील एक शेळी ठार करून, बिबट्याच्या जोडीने तिचा फडशा पाडला. त्यांची दुसरी शेळी जखमी झाली. राजेंद्र आग्रे यांच्या वस्तीवर मध्यरात्री दोन वाजता बिबट्याने प्रवेश केला. या वस्तीवर आठ-दहा घरे आहेत. राजेंद्र यांनी घराच्या खिडकीतून दोन्ही बिबट्यांच्या दिशेने फटाके पेटवून फेकले. फटाक्यांच्या आवाजाने बिबटे शेजारी असलेल्या बाजरीच्या पिकात जायचे. दहा मिनिटांनी पुन्हा परत यायचे. पहाटे पाच वाजेपर्यंत असा प्रकार सुरू होता. आसपासच्या वस्त्यांवरील नागरिकांनी फटाके फोडून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्यांचा वावर सुरू होता. त्यामुळे, घरातून बाहेर येण्याची कुणीही हिम्मत केली नाही. 

सकाळी वन खात्याचे कर्मचारी अंकराज जाधव, सुनील अमोलिक, कोळी, म्हैसगांवचे माजी सरपंच विलास गागरे, प्रा. संतोष माने यांनी घटनास्थळी भेट दिली. वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.  एक वर्षापूर्वी अंबादास विठोबा आग्रे (रा. आग्रेवाडी) यांची एक शेळी बिबट्याने केली होती. वनखात्याने त्याचा पंचनामा केला. परंतु, त्यांना आज पर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही.  त्याची चौकशी व्हावी. आजच्या व मागील घटनेतील पीडित कुटुंबांना वनखात्याने मदत द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर